घोषणा केंद्राची पण महाालिकेने उचलला भार… ५४ मृतांच्या कुटुंबांना दिली ५० लाखांची मदत!

केंद्र सरकारच्या नियमानुसार महापालिकेच्या सर्वच कोविडमुळे मृत्यू पावलेल्या कर्मचा-यांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत मिळण्यास अडचणी निर्माण होऊ लागल्या. त्यामुळे मुंबई महापालिकेने अशा मृत कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना स्वत:५० लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला.

89

कोविड विषाणूचा संसर्ग दुसऱ्या टप्प्यात जोरात सुरू असून, रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वरच्या टप्प्यात जाताना दिसत आहे. पण कोविडचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून, आतापर्यंत सुमारे २०० कर्मचारी हे मृत पावले आहेत. केंद्राने ५० लाख रुपये देण्याची घोषणा केली असली, तरी प्रत्यक्षात केंद्राकडून केवळ १७ महापालिका कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत देण्यात आली आहे. तर मुंबई महापालिकेने आतापर्यंत केंद्राने नाकारलेल्या ११४ अर्जांपैकी आपल्या ५४ मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० लाख रुपयांची मदत केली असून, उर्वरितांच्या अर्जावर कार्यवाही सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

महापालिकेने स्वतः केली कर्मचा-यांच्या कुटुंबियांना मदत

कोविडचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून महापालिकेचे कर्मचारी फ्रंट लाइनवर काम करत आहेत. त्यामुळे कोविड रुग्णांना करण्यात येणाऱ्या उपायायोजनांमध्ये महत्वाची भूमिका बजावताना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. आजवर हजारो कर्मचाऱ्यांना बाधा झाली असून, त्यातील सुमारे २०० कर्मचाऱ्यांचा आजमितीस मृत्यू झाला आहे. कोविडमुळे मृत्यू पावणाऱ्या फ्रंट लाइनच्या कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत केंद्र सरकारने घोषित केली. त्यानंतर मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनीही ही घोषणा केली. पण केंद्र सरकारच्या नियमानुसार महापालिकेच्या सर्वच कोविडमुळे मृत्यू पावलेल्या कर्मचा-यांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत मिळण्यास अडचणी निर्माण होऊ लागल्या. त्यामुळे मुंबई महापालिकेने अशा मृत कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना स्वत:५० लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला.

(हेही वाचाः कधी दिसणार आपल्याला पांडुमधला पांडुरंग ?)

अशी आहे आकडेवारी

आतापर्यंत कोरोनाने मृत्यू पावलेल्या २०० कर्मचाऱ्यांपैकी १३३ जणांचे अर्ज केंद्राकडे आर्थिक सहाय्याकरता पाठवले होते. पण त्यातील ११४ जणांचे अर्ज केंद्राच्या नियमांमध्ये बसत नसल्याने नाकारले गेले. केंद्राच्यावतीने केवळ १७ मृत कर्मचाऱ्यांनाच लाभ मिळाला. तर उर्वरित ११४ मृत कर्मचाऱ्यांचे अर्ज नाकारले गेल्यामुळे, त्यापैकी कागदपत्रांची पूर्ण पूतर्ता केलेल्या ५४ मृतांच्या कुटुंबियांना आतापर्यंत मुंबई महापालिकेच्यावतीने प्रत्येकी ५० लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. तर ३८ अर्जावर कार्यवाही चालू आहे. यामध्ये काहींच्या कुटुंबातील सदस्यांचाच आक्षेप आहे, तर काहींची कोविड संदर्भातील प्रमाणपत्रासह इतर कागदपत्रांची पूर्तता झालेली नाही. याबाबतची सर्व कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीचा लाभ दिला जाईल. उर्वरित मृत कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांकडून अद्यापही अर्ज प्राप्त झालेले नाहीत, त्यामुळे त्यांच्या अर्जावर पुढे निर्णय घेतला जाईल, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.