मुंबई महापालिकेला दीड लाख लसींचा साठा प्राप्त, पुढील तीन दिवस बहुतांशी केंद्रांवर होणार लसीकरण!

लस साठा उपलब्ध झाल्याने पुढील किमान तीन दिवस खासगी केंद्रांना देखील लसीकरण मोहीम राबवता येईल.

कोविड प्रतिबंधक लसीचे १ लाख ५८ हजार डोस मुंबई महापालिकेल २५ एप्रिल २०२१ रोजी प्राप्त झाले आहेत. या लसींचे शासकीय आणि खासगी लसीकरण केंद्रांना त्याचे वितरण सुरू करण्यात आले आहे. यामुळे सोमवार २६ एप्रिल ते बुधवार २८ एप्रिल, असे किमान तीन दिवस मुंबईतील लसीकरण सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

१३२ लसीकरण केंद्रांवर होते लसीकरण

प्राप्त लस साठ्यात कोवॅक्सिन लसीचा साठा अतिशय सीमित असल्याने, मोजक्याच केंद्रांवर आणि त्यातही दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्याने ही लस देण्यात येणार आहे. मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतर्गत महापालिका, शासन यांच्यातर्फे ५९, तर खासगी रुग्णालयांत ७३ अशी एकूण १३२ लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आलेली आहेत. मात्र, कोविड प्रतिबंधक लसीचा साठा मर्यादित स्वरुपात प्राप्त होत असल्याने, अधूनमधून काही केंद्रांवर लसीकरण तात्पुरते थांबवावे लागते. त्यातही दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य देणे क्रमप्राप्त असल्याने, लसींचा प्राप्त होणारा साठा लक्षात घेऊन दररोज लसीकरण मोहिमेचे नियोजन केले जात आहे.

(हेही वाचाः राज्यातील १८ वर्षावरील सर्वांना मोफत लस! महाविकास आघाडी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय)

इतक्या लसींचा झाला पुरवठा

महापालिकेला आज कोविशिल्ड लसीचे १ लाख ५० हजार तर कोवॅक्सिन लसीचे ८ हजार असे एकूण १ लाख ५८ हजार डोस प्राप्त झाले आहेत. हा साठा महापालिकेच्या कांजूरमार्ग येथील प्रादेशिक लस साठवण केंद्रात नेण्यात आला आहे. मुंबईतील महापालिका, शासकीय आणि खासगी अशा सर्व लसीकरण केंद्रांना कांजूरमार्ग येथूनच, त्यांची सरासरी दैनंदिन आवश्यकता लक्षात घेऊन लस साठा वितरण सुरू करण्यात आले आहे.

(हेही वाचाः सिरमनंतर भारत बायोटेकने जाहीर केल्या लसीच्या नव्या किंमती! किती रुपयात मिळणार कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड? वाचा…)

नागरिकांना आवाहन

लस साठा उपलब्ध झाल्याने पुढील किमान तीन दिवस खासगी केंद्रांना देखील लसीकरण मोहीम राबवता येईल. लस साठा प्राप्त झाल्यानंतर सायंकाळी उशिरापर्यंत त्याचे वितरण सुरू होते. ज्यांनी लस साठा आज नेला नाही, त्यांना २६ एप्रिल रोजी सकाळी ८ पासून लस साठा नेता येईल. ही बाब लक्षात घेता, सोमवार २६ एप्रिल रोजी काही केंद्रांवर लसीकरण उशिराने सुरू होण्याची शक्यता आहे. सर्व संबंधितांनी मुंबई महापालिका प्रशासनाला व आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे, असे विनम्र आवाहन करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here