मुंबई महापालिकेच्यावतीने वांद्रे येथील जागा डबेवाला भवनासाठी मंजूर करण्यात आल्यानंतर या जागेच्या वाटपाचे पत्र महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते मुंबई डबेवाला असोसिएशनला गुरुवारी प्रदान करण्यात आले. त्यामुळे डबेवाला असोसिएशनची मागील पाच वर्षांतील प्रतीक्षा संपली असून, शिवसेनेच्या वचननाम्यातील आणखी एका आश्वासनाची पूर्तता केली गेल्याने शिवसेनेच्या नेत्यांमध्येही आता समाधानाचे वातावरण पसरले आहे.
महापौरांच्या हस्ते जागेचे वाटप पत्र सुपूर्द
मुंबई महापालिकेच्यावतीने वांद्रे पश्चिम येथील शेरली, वांद्रे व्हिलेजमधील समाज कल्याण केंद्राची जागा मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स असोसिएशनला देण्यात आली असून, या जागेचे वाटप पत्र मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते गुरुवारी महापालिका मुख्यालयातील महापौर दालनात मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष रामदास करवंदे यांना सुपूर्द करण्यात आले.
(हेही वाचाः कोरोना नियंत्रणात तरीही रुग्णसेवा कोलमडणार…)
याप्रसंगी उप महापौर सुहास वाडकर, सभागृह नेता विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, सह आयुक्त (सुधार) रमेश पवार, सहायक आयुक्त (मालमत्ता) केशव उबाळे तसेच मुंबई डबेवाला असोसिएशनचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांच्या वचनांची पूर्तता
शेरली, बांद्रा व्हिलेज, बांद्रा येथील नगर भूखंड क्रमांक १३१७ ते १३१९, १३३० ते १३३१ येथील २८६.२७ चौरस मीटर क्षेत्रफळाची समाज कल्याण केंद्राची जागा मुंबई डबेवाला भवनासाठी देण्यात आली आहे. याप्रसंगी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या वचनांची वचनपूर्ती आज झाली आहे. यापुढील काळातही येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
Join Our WhatsApp Community