माघी गणेशोत्सवाबाबत महापालिकेला उशिरा जाग

107

यंदाचा माघी गणेशोत्सवाला २५ जानेवारी २०२३ पासून साजरा होत असून अवघ्या एक दिवस आधी मुंबई महापालिकेने यासाठीच्या मार्गदर्शन सूचना आणि नियम जारी केले आहे. एक दिवस आधी महापालिका प्रशासनाला जाग आली असून २४ जानेवारीला त्यांनी गणेश भक्तांसाठी मार्गदर्शन सूचना जारी करून नवीन उत्सव मंडळांच्या मंडपाना स्थानिक व वाहतूक पोलिसांचे ना – हरकत प्रमाणपत्र आवश्यक असल्याच्या सूचना जारी केल्या आहेत. मुंबईच्या विविध प्रकल्पांचे भुमिपूजन देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते होणार असल्याने याच्या कार्यक्रमांत व्यस्त असलेल्या महापालिकेला माघी गणेशोत्सवाचाही विसर पडल्याचे दिसून येते.

( हेही वाचा : देवेंद्र फडणवीसांना गृहीत धरू नका, सर्वांना पोहचवतील; जयंत पाटलांची कोपरखळी )

माघी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल व अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या निर्देशांनुसार परिमंडळ २ चे उप आयुक्त रमाकांत बिरादार यांच्याद्वारे सूचना देण्यात येत आहेत. यामध्ये त्यांनी येत्या माघी गणेशोत्सवा दरम्यान असलेला अल्प कालावधी व त्यानंतर लगेचच साजरा होणा-या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वतयारीमध्ये पोलिसांची असलेली व्यग्रता, या सर्व बाबी विचारात घेऊन माघी गणेशोत्सवासाठी प्राप्त होणा-या अर्जांपैकी ज्या मंडळांना गतवर्षी परवानगी देण्यात आली आहे, अशा मंडळांचे अर्ज स्थानिक व वाहतूक पोलिसांकडे न पाठवता, मागील वर्षीची परवानगी ग्राह्य धरुन विभाग कार्यालयांमार्फत छाननी करुन परवानगी देण्यात येणार आहे. नव्याने तथा प्रथमतः अर्ज करणा-या मंडळांच्या अर्जांच्या बाबतीत मात्र स्थानिक व वाहतूक पोलिसांचे ना – हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

विभागीय सहाय्यक आयुक्त यांनी त्यांच्या अधिपत्याखालील विभागात माघी गणेशोत्सवादरम्यान उभारावयाच्या कृत्रिम तलावांबाबत आवश्यक ती पडताळणी केल्यानंतर आवश्यकतेनुसार यथायोग्य सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही करण्यात येईल. माघी गणेशोत्सवादरम्यान मंडप उभारणीच्या परवानगीसाठी प्रतिवर्षीप्रमाणे असंगणकीय कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात येईल,असे म्हटले आहे.

कोविड – १९ किंवा त्या अनुषंगिक विविध प्रकारांच्या प्रादुर्भावाचा किंवा पुनरुद्भवाचा संभाव्य धोका विचारात घेता, शासनाने उत्सव कालावधीत ‘कोविड – १९’ या साथरोगाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध जारी केल्यास, या परिस्थितीत त्यांचे पालन केले जाईल, अशा आशयाचे हमीपत्र मंडळांकडून स्वीकारणे आवश्यक असेल.

महानगरपालिका आयुक्तांनी माघी गणेशोत्सवादरम्यान उभारण्यात येणा-या मंडपाचे शुल्क पूर्णपणे माफ करण्यास नुकतीच मंजुरी दिली आहे. यास्तव, फक्त याच वर्षापुरते माघी गणेशोत्सवादरम्यान उभारण्यात येणा-या मंडपांसाठी शुल्क पूर्णपणे माफ करण्यास मंजुरी दिली आहे. परंतु, विभाग कार्यालयामार्फत परिपत्रक निर्गमित होण्यापूर्वीच माघी गणेशोत्सवाच्या मंडपासाठी सशुल्क परवानगी दिली गेली असल्यास शुल्क परताव्याची कार्यवाही करण्याचे निर्देश २३ जानेवारी २०२३ रोजीच्या परिपत्रकांन्वये देण्यात आले आहे. मुंबईतील माघी श्री गणेशोत्सवादरम्यान महानगरपालिका व मुंबई पोलिस दल यांच्याद्वारे देण्यात येणा-या सुचनांचे नागरिकांनी तंतोतंत पालन करावे, असे आवाहन देखील मुंबई महानगरपालिकेद्वारे करण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.