रस्त्यावरील बेघरांसह भिकाऱ्यांच्याही पोटाची महापालिकेला काळजी!

लॉकडाऊनचा कालावधी वाढवल्यास या भिकारी व बेघर लोकांवर उपासमारीची वेळ येऊ नये, म्हणून महापालिकेच्यावतीने व्यवस्था करण्यात येत आहे.

कोरोना पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे रस्त्यांवरील भिकारी, तसेच बेघर लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. लॉकडाऊनमुळे लोकच घराबाहेर पडत नसल्याने, भिक्षा मागून उदरनिर्वाह करणाऱ्या भिकारी आणि बेघर लोकांची परवड होत आहे. म्हणून महापालिकेने आता त्यांच्याही पोटापाण्याची काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीलच्या विकेंड लॉकडाऊनच्या काळात केळी आणि बिस्कीटांचं वाटप करत त्यांच्यावर महापालिकेने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ दिली नाही. आता एका दानशूर संस्थेच्या माध्यमातून अन्नाच्या पाकिटांचे वाटप करत त्यांना भरल्या पोटी ढेकर देता यावी, याची काळजी महापालिकेने घेतली आहे. त्यामुळे तृतीयपंथी, देहविक्री करणाऱ्या महिलांपाठोपाठ रस्त्यांवरील भिकारी आणि बेघरांचीही चिंता वाहत महापालिकेच्या नियोजन विभागाने केलेल्या कामाला आता गरीबांचा आशिर्वाद मिळताना दिसत आहे.

10 हजार अन्न पाकिटांचे वाटप

मुंबई महापालिकेच्यावतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंशत: लॉकडाऊन लागू करण्यात आल्यानंतर, रस्त्यावरील भिकारी आणि बेघरांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे महापालिकेच्या नियोजन विभागाने प्रथम शनिवारी व रविवारी प्रत्येक विभागातील समाजविकास अधिकाऱ्यांना कामाला लावून, अशा लोकांचा शोध घेतला. त्यांना केळी व बिस्कीटांचे वाटप केले. यावेळी या पहिल्याच प्रयत्नात मुंबईत अशाप्रकारे ४ हजार ८३० लोक आढळून आले. दुस-या दिवशीही तेवढीच संख्या होती. या दोन दिवसांच्या वाटपात आढळून आलेल्या संख्येच्या आधारे, नियोजन विभागाने खासगी संस्थांशी संपर्क साधून अन्न पाकिटांची मागणी केली. यामध्ये नेस वाडिया यांच्याकडून दुपारी ५ हजार आणि रात्री ५ हजार अशा प्रकारे दहा हजार अन्न पाकिटे प्राप्त होऊ लागली. या सर्व अन्न पाकिटांचे सध्या रस्त्यांवरील भिकारी तसेच रस्त्यावर उघड्या छताखाली राहणाऱ्या बेघर लोकांना वाटप करण्यात येत आहे.

महापालिकेने मागवल्या निविदा

महापालिकेच्या नियोजन विभागाच्या सहाय्यक आयुक्त डॉ. संगीता हसनाळे यांनी पुढाकार घेत, आतापर्यंत खासगी संस्थेच्या मदतीतून ही अन्न पाकिटे पुरवली आहेत. पण या संस्थेकडून भविष्यात अन्न पाकिटे मिळण्याची शक्यता कमी असल्याने, आता दररोज दहा हजार अन्न पाकिटांसाठी निविदा मागवण्यात आली आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा कालावधी वाढवल्यास या भिकारी व बेघर लोकांवर उपासमारीची वेळ येऊ नये, म्हणून महापालिकेच्यावतीने व्यवस्था करण्यात येत आहे. मागील लॉकडाऊनमध्ये मजुरांची काळजी महापालिकेने घेतली होती. पण यावेळी ही जबाबदारी मालकांवरच सोपवलेली असून, रिक्षा आणि टॅक्सी चालक यांनाही सरकारने अनुदान जाहीर केले आहे. त्यामुळे रस्त्यावरील बेघर कुटुंब आणि भिकारी यांनाच या अन्न पाकिटांचे वाटप केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here