मुंबईतील मातीची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन स्थानिक प्रजातींचीच झाडे लावण्याच्या धोरणाला मंगळवारी मुंबई वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे आता मुंबईत स्थानिक प्रजातींची झाडे लावण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच नागरिकांनी देखील त्यांच्या सोसायटी परिसरात/प्रांगणात झाडे लावताना स्थानिक प्रजातींचीच झाडे लावावीत, असे आवाहन महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी यानिमित्ताने केले आहे. या मंजूर धोरणानुसार, स्थानिक प्रजातींच्या झाडांमध्ये सध्या ४१ प्रजातींचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती वृक्ष प्राधिकरणाचे सचिव तथा उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.
म्हणून घेण्यात आला निर्णय
पर्यावरणाच्या दृष्टीने तर वृक्षारोपणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मात्र, वृक्षारोपण करताना स्थानिक प्रजातींची व मुंबईतील मातीची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन येथील मातीत रुजेल, वाढेल आणि अधिक घट्टपणे मूळ धरेल, अशी झाडे लावणे आवश्यक आहे. स्थानिक प्रजातींच्या झाडांऐवजी इतर प्रजातींची झाडे लावल्यास ती मुंबईच्या मातीमध्ये घट्टपणे मूळ धरत नाहीत. परिणामी अशी झाडे पडण्याचा धोका अधिक असतो. ही बाब लक्षात घेऊन महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्या अध्यक्षतेखालील वृक्ष प्राधिकरणाने स्थानिक प्रजातींची झाडे लावण्याच्या धोरणाला मंजुरी दिली आहे.
(हेही वाचाः धक्कादायक! मुंबईत ९०० कोटींची मालमत्ता कराची चोरी! )
ही झाडे लावता येणार
बृहन्मुंबई परिसरात झाडे लावताना ४१ स्थानिक प्रजातींची झाडे लावण्यास प्राधान्य देण्याचे धोरण आज मंजूर करण्यात आले. यामध्ये वड, पिंपळ, उंबर, कांचन, कदंब, गुंज, पळस, निम, महोगनी, मोह, बहावा, साग, अर्जुन, ऐन, किंजळ, सीता अशोक, उंडल, नागकेशर, चंपा, शिवन, शिरीष, करंज, बकुळ, बेल, तामण, हिरडा, बेहडा, नारळ, आवळा, खैर, तेतू, आंबा, पुत्रंजीवा, जंगली बदाम, बिब्बा, पारिजातक, रिठा, चंदन, कुंभ, फणस, चाफा या ४१ प्रजातींच्या झाडांचा समावेश आहे. तसेच विविध कारणांमुळे वृक्ष उन्मळून पडल्यास त्या वृक्षाच्या जागी स्थानिक प्रजातींचीच झाडे लावण्यात येणार आहेत.
Join Our WhatsApp Community