Bmc Hospitals & Dispensary : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चिकित्सा योजना होणार बंद?

2353
Bmc Hospitals & Dispensary : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चिकित्सा योजना होणार बंद?
Bmc Hospitals & Dispensary : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चिकित्सा योजना होणार बंद?

मुंबई महापालिकेच्या दवाखान्यांसह (Bmc Hospitals & Dispensary) आरोग्य केंद्र आणि  विशेष  रुग्णालयांमध्ये हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपली चिकित्सा योजना अंतर्गत सुरु असलेली चाचण्यांची सुविधा आता बंद होण्याची शक्यता आहे. आपली चिकित्सा अंतर्गत चाचण्यांसाठी सुविधा देण्यासाठी नेमलेल्या संस्थेला मागील दहा महिन्यांपासून महापालिकेने चाचण्यांकरता आकारलेल्या शुल्काची रक्कम न दिल्याने अखेर या संस्थेने शेवटचे स्मरणपत्र पाठवून ही सेवा बंद करण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नसल्याचे कळवले असल्याची माहिती मिळत आहे.

बाळासाहेबांच्या नावाने विद्यमान शिंदे सरकारने ही योजना जाहीर करत विविध चाचण्यांची सुविधा बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांसह आरोग्य केंद्र व उपनगरीय रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या गरीब रुग्णांना नाममात्र दरात ही सुविधा उपलब्ध करून दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नातून आणि पुढाकारातून सुरु झालेल्या या योजनेअंतर्गत पुरवल्या जाणाऱ्या सुविधेचे पैसे प्रत्यक्षात मागील दहा महिन्यांपासून महापालिकेने अडवून ठेवले.  हे पैसे न मिळाल्याने आपल्या नियुक्त कर्मचाऱ्यांना पगारही देऊ न शकणार असल्याने संबंधित संस्थेने महापालिकेला पत्र लिहून आपली हतबलता व्यक्त करत  दवाखान्यांसह आरोग्य केंद्र व रुग्णालयांमध्ये सुरु असलेली ही सेवा थांबवण्याशिवाय पर्याय नसल्याचे कळवले आहे.

मुंबई महापालिकेची रुग्णालये, दवाखाने, प्रसुतीगृह आदी ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Bmc Hospitals & Dispensary) चिकित्साअंतर्गत खासगी प्रयोग शाळांच्या माध्यमातून चिकित्सा सुविधा सुरु करण्यासाठी महापालिकेने निविदेत पात्र ठरलेल्या क्रस्ना डायग्नोस्टीक सेंटरची निवड केली. शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे तिन्ही विभागांसाठी ही संस्थेची निवड करण्यात आली आहे. या संस्थेने मुलभूत चाचण्यांकरता प्रति रक्त नमुना ८६ रुपये व विशेष तथा प्रगत चाचण्यांकरता प्रति रक्त नमुना करता ३४४ रुपये एवढा दर आकारला आहे. त्यामुळे या संस्थेची निवड करत यासाठी सुमारे २७ कोटी ५२ लाख रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली गेली.

फेब्रुवारी २०२३ पासून क्रस्ना डायग्नोस्टिक सेंटर संस्थेच्या माध्यमातून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चिकित्सा अंतर्गत विविध चाचण्यांची सुविधा गरीब रुग्णांना पुरवली जात आहे. मात्र, मागील दहा महिन्यांपासून या संस्थेने केलेल्या विविध चाचण्यांच्या शुल्काचे अधिदान महापालिकेने संस्थेला अदा न केल्याने अखेर या संस्थेने आपण यापुढे ही सुविधा सुरु ठेवण्यास समर्थता दर्शवली आहे.  या संस्थेच्या माध्यमातून आजवर आपला दवाखाना तसेच महापालिकेचे इतर दवाखाने आणि आरोग्य केंद्र व उपनगरीय रुग्णालयांमध्ये ही सुविधा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपल्या खिशातून पगार दिले असले तरी मागील तीन महिन्यांपासून ही सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगारच मिळालेला नाही.

(हेही वाचा-Tesla CyberTruck : अंतराळ यानासारखा दिसणारा टेस्लाचा सायबर ट्रक नक्की आहे कसा?)

त्यामुळे  या संस्थेने यापूर्वी ऑक्टोबर आणि त्यानंतर नोव्हेंबर  २०२३मध्ये महापालिकेचे सहआयुक्त(मध्यवर्ती खरेदी खाते) यांना पाठवून अधिदान देण्याची मागणी केली होती,परंतु त्यानंतरही प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची ठोस कार्यवाही होत नसल्याने अखेर ११ डिसेंबर २०२३ रोजी या संस्थेने पुन्हा पत्र पाठवले असून हे अखेरच स्मरण पत्र असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे यापुढे जर प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही न झाल्यास ही सेवा बंद करण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नसेल असेही या पत्रात नमुद केल्याची माहिती मिळत आहे.

त्यामुळे प्रशासनाकडून या संस्थेच्या अधिदानाबाबत कोणत्याही प्रकारची कार्यवाही न झाल्यास विविध चाचण्यांसंदर्भातील सुविधा बंद होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ही सुविधा बंद झाल्यास विद्यमान सरकारची मोठी अडचण ठरणार असून बाळासाहेबांच्या नावाने सुरु केलेल्या योजनेचे पैसे न दिल्याने संबंधित संस्थेला आपले काम करावे लागले अशाप्रकारची नाचक्की महापालिका प्रशासनालाही सहन करावी लागणार आहे.

एका बाजुला सुशोभीकरणासह केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांवर कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्या महापालिका प्रशासनाला केवळ दहा कोटी रुपये देता न आल्याने गोरगरीबांना मिळणाऱ्या सुविधा बंद कराव्या लागल्या अशाप्रकारचा शिक्का महापालिकेच्या माथी मारला जाण्याचीही भीती वर्तवली जात आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री याप्रकरणात लक्ष घालून ही सुविधा सुरु ठेवण्याचा प्रयत्न करतात की पैशांअभावी ही सुविधा बंद हेच लवकरच स्पष्ट होईल.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.