रुग्णालयांना सीईओंची गरज: वरिष्ठ डॉक्टरांना प्रशासकीय कामांतून हवी मुक्तता

महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये पुन्हा एकदा सीईओ नेमण्याची गरज निर्माण झाली आहे.

152

घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात बेशुध्द रुग्णाचे डोळे उंदराने कुरतडल्याच्या घटनेनंतर, रुग्णालयातील प्रशासकीय कामांमुळे वैद्यकीय सेवा देणारी डॉक्टर मंडळी आणि महापालिकेची आरोग्य सेवा बदनाम होताना दिसत आहे. त्यामुळे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अजोय मेहता यांनी रुग्णालयांमधील अधिष्ठाता पदावरील डॉक्टरांचा भार कमी करुन, प्रशासकीय कामांसाठी विभागाच्या सहाय्यक आयुक्तांची विशेष कार्यकारी अधिकारी(सीईओ) म्हणून नेमणूक करण्याचा निर्णय घेतला होता. पुढे याला विरोध झाल्याने या कामांसाठी उपअधिष्ठाता पदावरील व्यक्तीची या कामांसाठी नेमणूक करण्याची मागणी झाली. परंतु राजावाडीतील या घटनेनंतर प्रमुख रुग्णालयांसह उपनगरीय रुग्णालयांमधील प्रशासकीय स्वरुपाची कामे करण्यासाठी, विभागाच्या सहाय्यक आयुक्तांवरच जबाबदारी टाकण्याची वेळ आली आहे.

शिवसेनेचा विरोध आणि प्रस्ताव बारगळला

महापालिकेच्या रुग्णालयांतील कारभारात समन्वय आणि सुसूत्रता आणण्यासाठी पालिकेने केईएम, कुपर, नायर आणि शीव रुग्णालयात सीईओ नेमून त्यांचा कारभार सहाय्यक आयुक्तांच्या हाती देण्याचा निर्णय तत्कालीन महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी घेतला होता. त्यानुसार अनुक्रमे किरण दिघावकर, प्रशांत सपकाळे, देवीदास क्षीरसागर आदींची नियुक्ती केली होती. परंतु विभागांच्या सहाय्यक आयुक्तांवर दुहेरी पदभार सोपवल्यामुळे सत्ताधारी शिवसेनेने याला तीव्र विरोध केला आणि त्यांनी रुग्णालयाचे उपअधिष्ठाता या पदावरील व्यक्तीवर ही जबाबदारी सोपवावी, अशी मागणी अजोय मेहता यांच्या जागी आलेल्या तत्कालीन आयुक्त प्रविण सिंह परदेशी यांच्याकडे केली होती. तत्कालीन आयुक्तांनी यावर सकारात्मक निर्णय घेण्याची तयारी दर्शवली. पण पुढे रुग्णालयातील प्रशासकीय कामांसाठी सीईओ नेमण्याचा प्रस्ताव बारगळला.

(हेही वाचाः राजावाडी हॉस्पिटलमधील ‘ते’ भंगार साफ)

मेहतांचा निर्णय

महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य सेवेतील वरिष्ठ पदांवर कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांना, त्यांच्या रुग्णालयाशी तसेच कार्यक्षेत्राशी संबंधित प्रशासकीय बाबीही हाताळाव्या लागतात. यामुळे डॉकटरांचा जास्त वेळ खर्ची होत असल्याने, या डॉक्टरांच्या अनुभवाचा व कौशल्याचा सुयोग्य व परिपूर्ण उपयोग रुग्णसेवेसाठी होण्यास मर्यादा येत होत्या. म्हणून तत्कालीन आयुक्त अजोय मेहता यांनी हा निर्णय घेतला होता.

म्हणून पुन्हा सीईओंची गरज

आज रुग्णालयांचे अधिष्ठाता किंवा अधिक्षक हे प्रशासकीय कामांमध्ये अधिक व्यस्त असतात. त्यांना विविध कामांचे प्रस्ताव तसेच रुग्णालयातील देखभालीच्या कामांचे ज्ञान नसल्याने, तसेच रुग्णालयातील कर्मचारी आणि त्यांच्या कामगार संघटना यांच्यापुढे डॉक्टरांचा निभाव लागत नसल्याने ही कामे विभागाच्या सहाय्यक आयुक्तांवर सोपवून खऱ्या अर्थाने डॉक्टरांना वैद्यकीय कामांकडे अधिक लक्ष देण्याचा निर्णय घेतला होता. काही दिवसांपूर्वी राजावाडी रुग्णालयात घडलेला प्रकार हा प्रशासकीय कामांमधील निष्काळजीपणामुळेच घडला. परंतु याचा मनस्ताप रुग्णालयाच्या अधिक्षिका, तसेच डॉक्टर मंडळी व कर्मचाऱ्यांना होत आहे. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये पुन्हा एकदा सीईओ नेमण्याची गरज निर्माण झाली आहे.

(हेही वाचाः आदित्य ठाकरेंनी सांगितल्यावरच आयुक्त ‘ती’ झाडं उचलणार का?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.