कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी मुंबई महापालिका सज्ज

तिस-या लाटेचा सामना करण्यासाठी महापालिकेची यंत्रणा सर्व उपाययोजनांसह सुसज्ज झाली आहे.

68

कोविडच्या तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांद्वारे वर्तवली जात आहे. या तिसऱ्या लाटेदरम्यान लहान मुलांना व झोपडपट्टी परिसरांमधील रहिवाशांना संसर्गाची अधिक शक्यता असल्याचे तज्ज्ञांद्वारे सांगितले जात आहे. त्यादृष्टीने सुसज्ज व सतर्क राहण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत. महापालिकेच्या सर्व ‘हेल्थ पोस्ट’च्या स्तरावर गृहभेटी वाढवण्यात याव्यात, तसेच सर्व झोपडपट्टी परिसर, सार्वजनिक शौचालये आणि सार्वजनिक सुविधा इत्यादींच्या ठिकाणी अधिक प्रभावी स्वच्छता राखण्यात यावी, असेही निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.

प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश

कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त(पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी सर्व परिमंडळ उपायुक्‍त, सर्व २४ प्रशासकीय विभागांचे सहाय्यक आयुक्त आणि आरोग्य विभागाचे संबंधित अधिकारी यांना कार्यवाही व अंमलबजावणीबाबत निर्देश दिले आहेत. यामध्ये त्यांनी महापालिकेच्या सर्व विभागस्तरीय सहाय्यक आयुक्तांनी आपापल्या क्षेत्रातील बालरोग तज्ज्ञांना विशेष प्रशिक्षण देण्याच्या‌ दृष्टीने कार्यवाही करावी व प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करावे. हे प्रशिक्षण कार्यक्रम प्रत्यक्ष पद्धतीने आयोजित करावेत. परंतु, सुरक्षित अंतर राखण्याच्या दृष्टीने प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन तुकड्यांमध्ये (बॅचेस) करण्यात यावे. तसेच या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांमधील संबंधित विभागातील ज्येष्ठ तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शन करतील. यादृष्टीने आवश्यक ते नियोजन करण्याची जबाबदारी महापालिकेचे संचालक(वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. रमेश भारमल यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्याचबरोबर ‘पेडियाट्रिक टास्क फोर्स’ मधील सदस्यांनाही मार्गदर्शक म्हणून या प्रशिक्षण कार्यक्रमांना निमंत्रित करण्यात यावे, असेही निर्देश दिले आहेत.

(हेही वाचाः मेट्रो कारशेडच्या जागेवर महापालिकेच्या कामालाच मनाई)

यंत्रणा सुसज्ज

या सर्व बाबींसंदर्भात प्रशासकीय विभागांच्या स्तरावर कृती आराखडा तयार करुन तो कार्यकारी आरोग्य अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात यावा. या निर्देशांनुसार सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी (फिल्ड ऑफीसर) त्वरित कार्यवाही सुरू केली आहे. या प्रशिक्षण उपक्रमाच्या अंमलबजावणीस तात्काळ चालना देण्याची सूचना अतिरिक्त आयुक्त काकाणी यांनी केली आहे. कोविडच्या संभाव्य तिस-या लाटेचा सामना करण्यासाठी महापालिकेची यंत्रणा सर्व उपाययोजनांसह सुसज्ज झाली आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.