गुजरात सरकारच्या धर्तीवर मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये माता, नवजात बालके आणि त्यांच्या नातेवाईकांची काळजी घेणाऱ्या खिलखिलाट रुग्णवाहिकांची सेवा सुरु करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. यासाठी तब्बल ५ खिलखिलाट रुग्णवाहिकांची खरेदी केली जाणार आहे.
मुंबई महापालिकेच्या विविध रुग्णालयांमार्फत माता, नवजात बालके आणि त्यांच्या नातेवाईकांना आरामदायी आसन व्यवस्थेसह बाळाची काळजी घेण्याची व्यवस्था, नीटनेटके आणि सुंदर भाग तसेच रंगीबेरंगी पडदे इत्यादी सुविधा असलेल्या खिलखिलाट रुग्णवाहिकांची सेवा महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये दिली जाणार आहे. अशा प्रकारच्या रुग्णवाहिका गुजरातमध्ये असल्याने त्या धर्तीवर या खिलखिलाट रुग्णवाहिकांची सेवा महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये देण्याचे निर्देश उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महापालिका प्रशासनाला दिले होते. त्यानुसार पाच खिलखिलाट रुग्णवाहिकांची खरेदी करण्याची प्रक्रिया राबवण्यात आली आहे. यासाठी महालक्ष्मी २४ फोर्स एलएलपी या कंपनीची निवड करण्यात आली. या निविदेत या कंपनीने रुग्णवाहिका वाहन २४ लाख १२ हजार रुपये तसेच ब्रँडींगच्या कामांसाठी १५ हजार रुपये आणि आतील रचनांची कामे आदींसाठी ३२ हजार रुपये अशाप्रकरे एकूण २४ लाख ६० हजार रुपयांमध्ये एक रुग्णवाहिकेची बोली लावली असून या सर्व रुग्णवाहिकांच्या खरेदीसाठी १ कोटी २३ लाख रुपये खर्च केले जाणार आहे.
(हेही वाचा BMC : वांद्रे पूर्व ते वाकोलादरम्यान यंदाही तुंबणार नाही पाणी; महापालिका प्रशासनाने केली ही उपाययोजना)
केईएम रुग्णालय, शीव रुग्णालय, नायर रुगालय, कुपर रुग्णालय आणि कांदिवली डॉ. बाबासाहेब आंबेडकर जनरल रुग्णालय येथे प्रसूतीनंतर माता, नवजात बालक आणि त्यांच्य नातेवाईकांना ड्रॉप बॅक सुविधा प्रदान करण्यात येतील असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. घनकचरा व्यवस्थापनाच्या माध्यमातून या खिलखिलाट रुग्णवाहिकांची खरेदी केली जात आहे.
Join Our WhatsApp Community