- सचिन धानजी, मुंबई
मराठा आरक्षण सर्वेक्षणासाठी नेमण्यात आलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या मानधन देण्याचा प्रश्न आजही प्रलंबित असून तब्बल वर्ष उलटत आले तरी कर्मचाऱ्यांना या मानधनाची रक्कम मिळालेली नाही. या मानधनाची रक्कम अवघ्या १५ दिवसांमध्येच मिळणे अपेक्षित होते. परंतु आजतागायत मानधनाची ही रक्कम न मिळाल्याने महापालिका प्रशासन ही रक्कम देणार की बुडवणर असा प्रश्न उपस्थित होत आहे. मराठा आरक्षणाबाबत मागील फेब्रुवारी महिन्यांमध्ये राज्यात सर्वे करण्यात आला असून मुंबईतील मराठा समाजाच्या सर्वेसाठी महापालिका कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आले होते. (BMC)
मुंबईतील मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणाच्या कामांसाठी महापालिकेच्या सुमारे २५ हजार कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांचे आदेश काढण्यात आले होते. त्यामुळे शासनाकडून याचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर यासर्व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात झाली होती. या कामासाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासनाच्या परिपत्रकानुसार दहा हजार रुपये मानधन आणि पाचशे रुपये प्रवास भत्ता दिला जाणार आहे. याला महापालिका प्रशासकांची मान्यताही प्राप्त झाली होती. तसेच या कामकाजासाठी नियुक्त करण्यात येणारे वर्ग दोन व त्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी यांना एक महिन्याच्या मूळ वेतनाच्या ५० टक्के इतकी रक्कम मानधन म्हणून देण्यास मान्यता दिली होती. (BMC)
(हेही वाचा – भारताचा बुद्धिबळपटू D Gukesh बनला विश्वविजेता)
परंतु या मानधनाची रक्कम देण्याबाबत कोणताही निर्णय न झाल्याने अखेर २८ ऑगस्ट २०२४ रोजी याचे परिपत्रक जारी करण्यात आले होते. मुंबई महापालिकेतील ज्या कर्मचाऱ्यांची मराठा आरक्षण सर्वेक्षणाकरिता नेमणूक करण्यात आलेली होती, अशा सर्व कर्मचाऱ्यांना देय्य असलेल्या मानधनाचे १५ दिवसात अधिदान करावे, असे आदेश उपायुक्त (आरोग्य) यांनी सर्व नोडल अधिकारी सहाय्यक आयुक्त, ए ते टी विभाग, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, ए ते टी विभाग आणि लेखा अधिकारी ए ते टी विभाग यांना दिले होते. यामध्ये प्रत्येक मानधनाच्या रकमेतून ३० टक्के रक्कम कापून घेत वेंडर कोड नुसार असलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रचलित पध्दतीने कराचे गणन करावे अशा सूचना केल्या होत्या. परंतु आदेश देऊन ४ महिने होत आले तरीही संबंधित कर्मचाऱ्यांना या मानधनाचे अधिदान करण्यात आलेले नाही. त्यामुळे या मानधनाची रक्कम महापालिका प्रशासन देणार की बुडवणार अशी शंका कर्मचाऱ्यांच्या मनात निर्माण होत आहे. (BMC)
दि म्युनिसिपल युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनीही महापालिका उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे यांना निवेदन देत आपल्याकडे याबाबत तक्रारी संघटना कार्यालयात प्राप्त झालेल्या आहेत. त्यामुळे आपण स्वतः लक्ष घालून, मुंबई महापालिकेतील ज्या कर्मचाऱ्यांची मराठा आरक्षण सर्वेक्षणाकरिता नेमणूक करण्यात आलेली होती, अशा सर्व कर्मचाऱ्यांना मानधनाचे तात्काळ अधिदान होण्याच्या अनुषंगाने उचित कार्यवाही करावी, ही विनंती केली आहे. चार महिन्यांपूर्वी दिलेल्या निर्देशाचे पालन अद्यापही होत नाही ही मोठी शोकांतिका असल्याचे बने यांनी म्हटले आहे. याबाबत कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांना विचारले असता त्यांनी याबाबतच्या सूचना संबंधित विभागांना करण्यात आल्या असून त्यानुसार कार्यवाही केली जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community