मुंबईकरांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून महानगरपालिकेच्या बाजार विभागामार्फत धडक कार्यवाही मोहीम हाती घेत गोवंडी (पश्चिम) येथे केना मार्केटबाहेर सुमारे चार हजार किलोहून अधिक मांस जप्त करण्याची कार्यवाही केली. या कार्यवाहीदरम्यान दंडात्मक कार्यवाही करण्यात आली आहे. तसेच अनधिकृतपणे व्यवसायात वापरण्यात येणारी साधन सामुग्रीही जप्त करण्यात आले आहे. नागरिकांनी उघड्यावरील पदार्थ खरेदी करू नये अथवा सेवन करू नये, असे आवाहन महानगरपालिकेमार्फत पुन्हा एकदा करण्यात येत आहे. (BMC Market Dept Action)
मुंबईतील नागरिकांचे आरोग्य उत्तम रहावे, यासाठी वेळोवेळी उपाययोजना करण्यासाठीच्या सूचना बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिल्या आहेत. अनधिकृतपणे मांसविक्री करणाऱ्यांविरोधात धडक कार्यवाही मोहीम राबवण्याच्या सूचना डॉ. सुधाकर शिंदे यांनी बाजार विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रकाश रसाळ यांना दिल्या होत्या. बाजार विभागामार्फत धडक कार्यवाही करत लागोपाठ दोन दिवस धडक मोहीम राबवतानाच ४ हजार किलोंहून अधिक मांस जप्त करण्याची कारवाई केली आहे. (BMC Market Dept Action)
(हेही वाचा – Ajit Pawar : बारामती लोकसभेसाठी अजित पवारांची आव्हानाची भाषा; शरद पवारांवरही टीका )
महानगरपालिका अधिनियम १८८८ मधील कलम ४१० (१) अन्वये जनावरांच्या अनधिकृत आयातीवर, कत्तलीवर आणि अनधिकृत मांस, अनधिकृत कोंबडी व अनधिकृत मासळी विक्रेत्यांवर कार्यवाही नियमितपणे करण्यात येते. याच अंतर्गत गोवंडी पश्चिम परिसरात नुकत्याच झालेल्या धडक कारवाईत सुमारे २ हजार ८०० किलो बकऱ्यांचे मांस जप्त करण्यात आले. कारवाईसाठी स्थानिक पोलिसांच्या मदतीसह, एम पूर्व विभागाच्या अनुज्ञापन खात्याचे कर्मचारी आणि सहाय्यक अभियंता (परिरक्षण) उपस्थित होते. नुकत्याच करण्यात आलेल्या या कारवाईत शेळ्यामेढ्यांचे १ हजार ४६० किलो मांस जप्त करण्यात आले. तसेच प्रचलित पद्धतीनुसार या मांसाची देवनार क्षेपणभूमी येथे विल्हेवाट लावण्यात आली. ‘एम पूर्व’ विभागाच्या अनुज्ञापन खात्यामार्फत सहा दुकांनांच्या ठिकाणी झालेल्या कार्यवाहीत ६ डिप फ्रिज, २१ एलपीजी सिलेंडर, ९ भांडी आणि इतर सामान जप्त करण्यात आले. ‘एम पूर्व’ विभागाचे सहाय्यक अभियंता यांच्या नेतृत्वात रस्त्यावरील अतिक्रमण निष्कासन कार्यवाही करण्यात आली. तसेच देवनार पोलीस ठाणे येथे तीन व्यक्तींविरोधात दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. (BMC Market Dept Action)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community