मुंबईकरांचा रक्तदाब तपासणार आता महापालिका घरोघरी जात!

79

बदलत्या जीवन शैलीमुळे आता लोकांमध्ये रक्तदाब, मधुमेहासह इतर आजारांचे प्रमाण वाढू लागले असून आता या सर्व आजारांचे प्राथमिक निदान करण्यासाठी महापालिकेची टिम आता घरोघरी जाणार आहे. महापालिकेच्या आरोग्य सेविक तसेच आशा वर्कर्स यांना याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून वयाची तिशी पार केलेल्या सर्वांचे रक्तदाब तपासून त्यांची यादी तयार केली जाणार आहे. यामध्ये आढळून येणाऱ्या रक्तदाबानुसार संबंधितांना दवाखान्यांमध्ये पाठवून पुढील चाचणी आणि उपचार केले जाणार आहे. त्यामुळे भविष्यातील ह्दविकार तसेच किडणीसह इतर आजारांनी शरीरात हातपाय पसरण्यापूर्वीच प्राथमिक निदान करत उपचाराला सुरुवात करत या आजारांपासून लोकांचे संरक्षण करण्याचा निर्धार महापालिकेच्या आरोग्य विभागाने केला आहे.

लोकांचे संरक्षण करण्याचा निर्धार

वाढत्या अतिताणामुळे अनेकांमध्ये रक्तदाब आणि उच्च रक्तदाबाचे प्रमाण वाढू लागले असून यावर निदान न केल्यास आजाराचे प्रमाणही वाढले जाते. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने मुंबईतील प्रत्येक वस्त्यांमधील ३० वर्षांवरील नागरिकांचे घरोघरी जावून रक्तदाब तपासण्याची मोहिम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेला येत्या ऑक्टोबरपासून सुरु होणार असून यासाठी दवाखान्यांच्या डॉक्टरांसह अधिकारी आदींच्या प्रशिक्षणाचा पहिला टप्पा पार करण्यात आल्यांनतर आता आरोग्य सेविका व आशा वर्कर्स आदींना प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यामुळे तिशी पार केलेल्या घरातील प्रत्येकाचा रक्तदाब तपासून त्यांची नोंद ठेवली जाईल. रक्तदाबाच्या नोंदणीनुसार संबंधितांना दवाखान्यांमध्ये वर्ग करून त्यांच्यावरील पुढील उपचाराला सुरुवात केली जाईल,अशी माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ.संजीव कुमार दिली आहे.

( हेही वाचा : आता कोविड रुग्णांवर उपचार सेव्हन हिल्ससह महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये, एकमेव शीव कोविड सेंटर ठेवले राखीव)

यासाठी प्रत्येक आरोग्य सेविका व आशा वर्कर्स यांना रक्तदाब नोंदणीची डिजिटल यंत्र उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यानुसार ही नोंदणी केली जाईल. अतिताणामुळे रक्तदाबाच्या समस्या वाढत असून याकडे जर वेळीच लक्ष दिले नाही तर ह्दविकार, किडनीचे आदी आजारांचे प्रमाणही वाढले जाते. त्यामुळे प्राथमिक स्तरावर निदान करण्यासाठी ही मोहिम राबवली जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली याबाबतचे प्रशिक्षण दिले जात असून यामध्ये ज्या व्यक्तीच्या पुढील चाचणी करणे आवश्यक असेल त्यांना नजिकच्या आरोग्य केंद्रात पाठवले जाईल. त्यानुसार रक्तदाब व उच्च रक्तदाबाच्या आजारावर उपचार केले जातील,असेही त्यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.