BMC : मुंबईत पुढील आठवड्यापासून ‘मेरी माटी मेरा देश’ अभियान

185

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या निर्देशानुसार मागील वर्षभरात ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाची सांगता ‘मेरी माटी मेरा देश’ या अभियानाने होणार आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या वतीने देखील मुंबईत दिनांक ९ ते १४ ऑगस्टदरम्यान ‘मेरी माटी मेरा देश’ अभियान अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दरम्यान, ‘मेरी माटी मेरा देश’ अभियानाचा शुभारंभ सोहळा ९ ऑगस्ट २०२३ रोजी ऑगस्ट क्रांती मैदान येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्य उपस्थितीत होणार आहे. उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री अजित पवार, मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी, मान्यवर यांची देखील या सोहळ्यास उपस्थिती राहणार आहेत.

या अनुषंगाने अभियानाचा शुभारंभ सोहळा तसेच अभियान अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन आणि अंमलबजावणीसंदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी आज (दिनांक ४ ऑगस्ट २०२३) महानगरपालिका मुख्यालयात पूर्वतयारी बैठक घेतली. यावेळी महानगरपालिका आयुक्तांनी विविध खात्यांना योग्य ते निर्देश दिले.

‘मेरी माटी मेरा देश’ अभियानाचा शुभारंभ दिनांक ९ ऑगस्ट २०२३ रोजी ऑगस्ट क्रांती मैदानावर आयोजित मुख्य समारोहाने होईल. यावेळी केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार, ‘शिलाफलकम’चे अनावरण केले जाईल. तसेच याच ठिकाणी ‘वसुधा वंदन’ अंतर्गत वृक्षारोपण करण्यात येईल.

अभियान कालावधीत, महानगरपालिकेच्या सर्व २४ विभाग कार्यालय (वॉर्ड) स्तरावर पंच प्रण (शपथ), वसुधा वंदन, वीरांना वंदन, ध्वजवंदन आयोजन केले जाणार आहे. ‘मेरी माटी मेरा देश’ अभियानातील सर्व उपक्रमांमध्ये मुंबईकरांनी कृतीशील सहभाग घ्यावा, असे आवाहन चहल यांनी केले आहे.

(हेही वाचा Maharashtra Session : पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजले; ७ डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन)

शिलाफलकम

शिलाफलकमवर देशाच्या रक्षणार्थ बलिदान दिलेल्या स्थानिक शहीद वीरांची नावे कोरली जाणार आहेत. तसेच माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा ‘व्हिजन २०४७ संदेश’, संस्थेचे नाव, दिनांक या बाबी समाविष्ट असतील.

पंच प्रण (शपथ)

शासनाने दिलेल्या शपथेच्या नमुन्यानुसार, हातात माती किंवा मातीचा दिवा घेऊन नागरिकांनी शपथ घ्यावयाची आहे. ही शपथ नागरिकांसाठी https://merimaatimeradesh.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्रत्येक नागरिकाने शपथ घेतानाचे छायाचित्र याच संकेतस्थळावर अपलोड करावयाचे आहे.

वसुधा वंदन

ऑगस्ट क्रांती मैदानासह शहर, पूर्व उपनगरे, पश्चिम उपनगरे अशा तीन ठिकाणी ७५ स्थानिक प्रजातीच्या वृक्षरोपांची लागवड करुन अमृतवाटिका तयार करण्यात येईल.

वीरांना वंदन

स्थानिक वीर, तसेच कर्तव्यावर असताना शहीद झालेले जवान, सेवानिवृत्त व कार्यरत असलेले तिन्ही संरक्षण दलातील जवान, केंद्रीय सुरक्षा दल, केंद्रीय सशस्त्र दल, राज्य पोलिस दलाचे जवान व स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबीय इत्यादींचा ‘वीरांना वंदन’ या कार्यक्रमातून सन्मान करण्यात येईल.

ध्वजवंदन आणि राष्ट्रगीत गायन

मुंबईतील सर्व विभाग कार्यालय, शाळा, कार्यालये इत्यादी ठिकाणी दिनांक ९ ते १४ या कालावधीत राष्ट्रध्वज फडकविणे व राष्ट्रगीत गायन कार्यक्रम आयोजित करण्यात येईल.

माटी यात्रा

प्रत्येक प्रभागातून आणलेली माती एका कलशामध्ये गोळा करून तो कलश जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केला जाईल. हा कलश जिल्हाधिकारी यांचेकडून दिनांक २७ ते ३० ऑगस्ट दरम्यान दिल्ली येथे होणाऱ्या मुख्य समारोहासाठी रवाना करण्यात येईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.