मुंबईत रविवारी मध्य रात्रीपासून कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे भांडुप, कुर्ला, चुनाभट्टी आदी भागात पाण्याचा निचरा संथ गतीने होत असल्याचे दिसून आले. या भागांत भविष्यात अधिक काटेकोरपणे नियोजन करून मुंबई महानगरपालिकेसह इतर यंत्रणांची चमू व यंत्रसामुग्री सुसज्ज ठेवण्याचे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिला आहे. (BMC)
पंपांसाठी वीज वितरण कंपन्यांकडून थेट ग्रीड कनेक्शनची पर्यायी व्यवस्था
तसेच मुसळधार पावसा दरम्यान, जनरेटर बंद पडू शकतात, ही शक्यता लक्षात घेऊन या पंपांसाठी वीज वितरण कंपन्यांकडून थेट ग्रीड कनेक्शन घ्यावे व डिझेल जनरेटर हे पर्यायी स्वरूपात कार्यतत्पर ठेवावेत, असे आदेश अध्यक्षांनी या बैठकी दरम्यान दिले. तसेच रेल्वे मार्गांवर ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा संथ गतीने होत होता, अशा सर्व ठिकाणी महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी आणि रेल्वेचे संबंधित अभियंते व अधिकारी यांनी संयुक्त पाहणी करावी, असेही निर्देश दोन्ही आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांच्या अध्यक्षांनी या बैठकी दरम्यान दिले आहेत. (BMC)
गुरुवारी पार पडली बैठक
मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मुंबई शहर आणि उपनगरे यांची आढावा बैठक गुरुवारी पार पडली. या बैठकीला दोन्ही आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांच्या अध्यक्षांसह मुंबई महानगरपालिकेचे सह आयुक्त (सामान्य प्रशासन) मिलिन सावंत, संचालक (आपत्कालीन व्यवस्थापन) महेश नार्वेकर, सह आयुक्त (वाहतूक शाखा, मुंबई पोलिस) अनिल कुंभारे, प्रमुख अधिकारी (आपत्कालीन व्यवस्थापन) रश्मी लोखंडे, राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (एनडीआरएफ), मध्य आणि पश्चिम रेल्वे, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए), मुंबई अग्निशमन दल, बेस्ट, वीज वितरण कंपन्यांचे प्रतिनिधी, म्हाडा आदींसह विविध प्राधिकरणांचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. (BMC)
(हेही वाचा – Monsoon Session : छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या धर्तीवर “अर्बन नक्सल” रोखण्यासाठी नवीन कायदा)
मुंबई महानगरपालिकेसह इतर यंत्रणांची चमू व यंत्रसामुग्री सुसज्ज
मुंबई शहर आणि उपनगरात सोमवार ८ जुलै २०२४ रोजी मध्यरात्री २ वाजेपासून ९ जुलै २०२४ रोजी मध्यरात्री २ वाजेपर्यंतच्या २४ तासांत ४०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस कोसळला. इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळूनही मुंबईतील जनजीवन सुरळीत होते. परंतु, भांडुप, कुर्ला, चुनाभट्टी आदी भागात पाण्याचा निचरा संथ गतीने होत असल्याचे दिसून आले. या भागांत भविष्यात अधिक काटेकोरपणे नियोजन करून मुंबई महानगरपालिकेसह इतर यंत्रणांची चमू व यंत्रसामुग्री सुसज्ज ठेवा. त्याचबरोबर इतर सर्व संबंधित यंत्रणांची अधिक चांगला समन्वय साधण्यासह अधिक चांगले सुव्यवस्थापन साध्य करण्याचे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांचे पदसिद्ध अध्यक्ष तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांनी दिले आहेत. (BMC)
संथ गतीने पाण्याचा निचरा, तिथे अधिक पंप
त्याचबरोबर ज्या भागात पाण्याचा निचरा संथ गतीने होत असल्याचे आढळून आले होते, त्या भागांमध्ये अधिक पंप बसविणे किंवा अधिक क्षमतेचे पंप बसविणे यासारख्या उपाययोजना राबवाव्यात. तसेच मुंबईतील रेल्वेसेवा आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत रहावी, यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही करावी आणि या दृष्टीने नियमितपणे आवश्यक ती तपासणी देखील करावी, असेही निर्देश गुरुवारच्या बैठकीत देण्यात आले. (BMC)
पंप नेण्यासाठीची टोईंग व्हॅनची व्यवस्था
भविष्यात ही कार्यवाही अधिक चांगल्या पद्धतीने व तत्परतेने करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आपत्कालीन परिस्थितीदरम्यान प्रवासात अडकलेल्या नागरिकांना आवश्यक ते सहकार्य व मदत वेळच्या वेळी मिळावी, या दृष्टीने सुव्यस्थित नियोजन आराखडा तयार ठेवण्याचेही निर्देश देण्यात आले. महानगरपालिका क्षेत्रात खबरदारीची उपाययोजना म्हणून मुंबई महानगरपालिकेने सुमारे ४०० ठिकाणी पाणी उपसा करणारे पम्प पावसाळ्यापूर्वीच बसविले आहेत. हे सर्व पंप योग्यप्रकारे कार्यरत असल्याची खातरजमा नियमितपणे करून घ्यावी. अतिरिक्त मनुष्यबळ, पाणी उपसा करणारे पंप, तसेच पंप नेण्यासाठीची टोईंग व्हॅन इत्यादी व्यवस्था तत्पर ठेवावी, असेही निर्देश डॉ. जोशी आणि डॉ. सैनी यांनी आजच्या बैठकीदरम्यान दिले. तसेच काही ठिकाणी पंप हे जनरेटरच्या आधारे चालविण्यात येत आहेत. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community