मुंबईतील कोरोना नियंत्रणात आणणारे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी कोरोनाबाधित!

गुरुवारी सुरेश काकाणी यांची काहीशी तब्येत बिघडली, त्यामुळे त्यांची कोरोना चाचणी केली, तो अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मुंबईतील कोरोनाचा आजार नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेची यंत्रणा कामाला लावून त्यांच्याकडून उपाययोजना राबवून घेणारे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांना कोरोनाने अखेर गाठले. कोरेाना विषाणूचा धोका निर्माण झाल्यानंतर पहिल्या अगदी फेब्रुवारी २०२०पासून या आजाराच्या निर्मुलनासाठी काम करणारे काकाणी यांनी आजवर कोविडपासून स्वत:चा बचाव केला. परंतु मागील तीन दिवसांपूर्वीच त्यांचा अहवाल कोविडबाधित आढळून आला आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेच्या पूर्वसंध्येलाच महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांना बाधित करून कोरोनाने महापालिकेच्या दरवाजावर येऊन तिसऱ्या लाटेची पूर्वसूचना देत सावध केले आहे. त्यांच्यावर सध्या अंधेरीतील सेव्हन हिल्स रुग्णालयांत उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.

काकाणी सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल

मुंबईत कोरोनाचा पहिला रुग्ण ११ मार्च २०२०ला आढळून आला असला तरी केरळमध्ये या आजाराचे रुग्ण आढळून आल्यापासून आरोग्य विभागाची जबाबदारी सांभाळणाऱ्या अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी कोविड उपाययोजनांच्या दृष्टीकोनातून बैठका घेवून सर्व रुग्णालयांमध्ये व्यवस्था केली होती. मात्र, तेव्हापासून ते कोविडची ही दुसरी लाट येईपर्यंत काकाणी यांनी इतर डॉक्टर व अत्यावश्यक सेवांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांप्रमाणेच रात्रीचाही दिवस करून काम केले. संपूर्ण दीड वर्षांच्या कालावधीत केवळ दोनच दिवस सुट्टी घेणाऱ्या या अधिकाऱ्याने कोविड काळात स्वत:ला संपूर्ण झोकून देत खऱ्या अर्थाने मुंबईला कोविडमुक्त करण्याचा प्रयत्न केला. या अधिकाऱ्यामुळेच आज मुंबई कोविड दुसऱ्या लाटेतूनही सावरली गेली आहे. मात्र, आजवर सावधगिरी बाळगणाऱ्या या अधिकाऱ्याला अखेर कोविडची बाधा झाली आहे. गुरुवारी त्यांना काही प्रमाण बरे वाटत नसल्याने त्यांची कोविड चाचणी करण्यात आली होती, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येते.

(हेही वाचा : लोकलमध्ये वाढली गर्दी! कोरोनाच्या संसर्गाचीही भीती!)

मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांचा काकाणी यांच्यावर विश्वास

मुंबईत कोविड नियंत्रणात आणण्यामागील महापालिकेचे चाणाक्ष अधिकारी काकाणी यांची ओळख असून कुठल्याही प्रसिध्दी झोतात न राहता ते आपल्या आरोग्य विभाग व इतर विभागांच्या मदतीने त्यांनी कोविड नियंत्रणाकडे अधिक लक्ष दिले आहे. संपूर्ण कोविड काळात त्यांनी केलेल्या कामगिरीमुळे खुद्द मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आरोग्यमंत्री यांच्यासह टास्क फोर्सच्या समितीचाही काकाणी यांच्यावर विश्वास आहे. काकाणी हे कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी ज्याप्रकारे काम करत आहे, त्याप्रकारे इतर कोणत्याही महापालिकेतील अधिकारी एवढ्या काटेकोरपणे आणि जीव ओतून काम करत नाही. त्यामुळे मुंबईतील कोरोना नियंत्रणात आणण्यात काकाणी यांचा मोठा हातभार असून याचे सर्वाधिक श्रेय हेही त्यांनाच जात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here