कोविड-१९ च्या महामारीमुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून बायोमेट्रीक प्रणालीव्दारे उपस्थिती नोंदविण्याची पध्दत बंद करण्यात आली होती. परंतु आता ही प्रणाली येत्या नवीन वर्षापासून सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी बायोमेट्रिक मशीन येत्या ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत सुस्थितीत राखण्याचे किंवा अतिरिक्त खरेदी करण्याची गरज भासल्यास त्या मशीनची खरेदी करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.
मोजक्या कामगार आणि कर्मचाऱ्यांनी घेतला गैरफायदा
मुंबई महापालिका कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांची उपस्थिती नोंदवली जाणारी बायोमेट्रिक प्रणाली बंद करण्याबाबतचे परिपत्रक मार्च २०२० रोजी जारी करण्यात आले होते. तेव्हापासून कोविडमुळे कर्मचाऱ्यांची उपस्थिती हजेरी पुस्तकात नोंदवल्या जात आहे. मात्र, याचा गैरफायदा काही मोजक्या कामगार आणि कर्मचाऱ्यांकडून घेतला जात आहे. मागील आठवड्यात केंद्र शासनाचे उपसचिव यांनी बायोमेट्रीक प्रणालीद्वारे उपस्थिती नोंदविण्याची स्थगित करण्यात आलेली पध्दत पुन्हा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच कोविडचा आजार नियंत्रणात आल्याने कर्मचाऱ्यांची उपस्थिती पुन्हा बायोमेट्रिक मशीनवर नोंदवण्याबाबतचे परिपत्रक १६ नोव्हेंबर २०२१ सामान्य प्रशासन विभागाने जारी केले आहे. त्याअनुषंगाने, मुंबई महानगरपालिकेतील सर्व खाते, विभाग कार्यालयातील कामगार – कर्मचारी – अधिकारी यांनी बायोमेट्रीक प्रणालीव्दारे उपस्थिती नोंदवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
(हेही वाचा मालेगाव दंगल : अटक सत्र सुरूच, नुकसानीच्या वसुलीचा प्रस्तावही तयार)
प्रशासनाने काय केल्या सूचना?
- महानगरपालिकेतील सर्व कामगार – कर्मचारी व अधिकारी यांनी ०१ जानेवारी २०२२ पासून बायोमेट्रीक प्रणालीद्वारेच उपस्थिती नोंदवावी.
- सर्व खाते प्रमुख, सहायक आयुक्त यांनी त्यांच्या नियंत्रणाखालील संबंधित आस्थापना प्रमुखांना, बायोमेट्रीक मशीन सुस्थितीत आहेत किंवा कसे याबाबत खातरजमा करून घ्यावी, बायोमेट्रीक मशीन्स नादुरुस्त असल्यास, त्या तातडीने ३१ डिसेंबर २०२१ पूर्वी दुरुस्त करून घेण्याच्या सूचना द्याव्यात. बायोमेट्रीक मशीन्स दुरुस्त होण्यासारखे नसल्यास संबंधित आस्थापना विभागाने आवश्यकतेनुसार खरेदी करण्याची कार्यवाही करावी. तसेच बायोमेट्रीक मशीन्स जवळ कर्मचाऱ्यांची होणारी गर्दी टाळण्यासाठी, गरज भासल्यास अतिरिक्त बायोमेट्रीक मशीन्सची व्यवस्था करावी.
- बायोमेट्रीक मशीन ३१ डिसेंबर २०२१ पूर्वी सुस्थितीत कार्यान्वित करण्याची जबाबदारी संबंधित खातेप्रमुखांची राहील.
- सर्व खाते प्रमुख, सहायक आयुक्त यांनी त्यांच्या नियंत्रणाखालील संबंधित आस्थापना प्रमुखांना, बायोमेट्रीक मशीन जवळ सॅनिटायझर उपलब्ध करुन देण्याची खबरदारी घेण्याच्या सूचना द्याव्यात.
- सर्व कामगार-कर्मचारी व अधिकारी यांनी बायोमेट्रीक प्रणालीद्वारे उपस्थिती नोंदवितांना योग्य त्या कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा वापर करावा.