कोविड बाधित रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली असून त्यामुळे विना मास्क कारवाई पुन्हा एकदा कडक करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत. परंतु यापूर्वी अशा प्रकारे दंड आकारणारे बोगस क्लीन अप मार्शल आढळून आल्याने याला आळा घालण्यासाठी आता महापालिकेने टोल फ्री क्रमांक १८००२२१९१६ उपलब्ध करून दिला आहे.
विनामास्क फिरणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येतेय
क्लीन अप मार्शल यांना दंडाची रक्कम देण्यापूर्वी गणवेष, विभागाचे नाव इत्यादी बाबींची खातरजमा करुन घ्यावी, असे आवाहनच महानगरपालिकेने केले आहे. त्यामुळे क्लीन अप मार्शलबाबत शंका आहे, तर या हेल्पलाईनवर संपर्क साधा, असेच म्हणण्याची वेळ आली आहे. कोविड-१९ विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून मुंबईत मास्क लावणे प्रत्येकास बंधनकारक आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास २०० रुपयांचा दंड आकारला जातो. मात्र मुंबईत कोविड-१९ विषाणू संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला असून हा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा भाग म्हणून सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे.
(हेही वाचा शासकीय आणि महापालिका कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी ‘या’ तारखेपर्यंत बंद!)
दंडाची रक्कम क्लीनअप मार्शलकडे देण्यापूर्वी खातरजमा करा
मात्र, या प्रकारची कारवाई होत असताना, क्लीनअप मार्शल यांनी गणवेष परिधान केलेला असणे, त्यांच्या गणवेषावर संबंधित विभागाचे नाव व अनुक्रमांक असणे, तसेच दंडाची पावती देणे या सर्व बाबी आवश्यक आहेत. त्यामुळे संबंधित नागरिकांनी दंडाची रक्कम क्लीनअप मार्शलकडे देण्यापूर्वी या सर्व बाबींची खातरजमा करावी. दंड भरल्यानंतर त्याची पावती आवर्जून घ्यावी. तसेच आवश्यकता भासल्यास टोल फ्री क्रमांक १८००२२१९१६ यावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community