महापालिकेच्या शुद्ध पाण्याचे कौतुक सरले, दूषित पाण्याच्या तक्रारीत वाढ!

तीन महिन्यांपासून दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. या दूषित पाण्यामुळे स्थानिक रहिवाशांना पोटाचे आजार होवू लागले असून स्थानिक डॉक्टरांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

186

मुंबई महापालिकेच्यावतीने शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जात असल्याने भारतातील नामांकित अशा इंडियन वॉटर वर्क्स असोशिएशनच्यावतीने ‘जल निर्मलता’ पुरस्कार देवून महापालिकेचा गौरव करण्यात आला. परंतु हा पुरस्कार मिळून दहा दिवस उलटत नाही तोच नगरसेवकांकडून दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारी दाखल होवू लागल्या आहे. कांदिवली चारकोप आदींसह कुर्ला भागांमध्ये चक्क मलमिश्रित प्रदूषित पाणी लोकांना पुरवले जात असून महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मात्र यावर कोणताही उपाय शोधता येत नसल्याचा त्रागा नगरसेवकांनी केला आहे.

पिण्याच्या पाण्यामध्ये गटार व शौचालयांचे पाणी मिसळते!

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत भाजपचे नगरसेवक कमलेश यादव यांनी हरकतीच्या मुद्याद्वारे कांदिवली चारकोप भागांमध्ये प्रदूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याची बाब निदर्शनास आणून देत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. चारकोप परिसरातील नागरिकांना गटार व शौचालयांमध्ये पाणी पिण्याच्या पाण्यामध्ये मिसळून दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. कांदिवली शॉपिंग सेंटर ते हिंदुस्थान नाका आदी भागातून जाणारी ३५० मीटरची जलवाहिनी ही जुनी झाली असून झाडांच्या मुळांमुळे या जलवाहिनी जीर्ण झाल्याने गटारांमधील पाणी त्यामध्ये शिरले जात आहे. त्यामुळे ही जलवाहिनी बदलण्याची गरज असूनही जलअभियंता विभाग केवळ ३५ मीटरची जलवाहिनी बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. याबाबत स्थानिक नगरसेवकाने तक्रार करूनही प्रशासन लक्ष देत नाही. परिणाम जनतेला दूषित पाण्याचा सामना करावा लागत आहे.

(हेही वाचा : थकीत मालमत्ता करावर दोन टक्के दंड, तुघलकी निर्णयाविरोधात नगरसेवक आक्रमक)

पोटाचे आजार वाढले!

याला शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी यांनी पाठिंबा देत चारकोप सेक्टर ८, ५ व ३मध्येही अशीच परिस्थिती असल्याचे सांगितले. गटाराचे पाणी जलवाहिन्यांमध्ये शिरुन दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. मागील २० दिवसांपासून ही समस्या असून आता या भागाला टँकरने पाणी पुरवठा करता येत नाही. कधी टँकर नाही तर कधी टँकरचा चालक नाही, अशी परिस्थिती असल्याचे सांगितले. यावर कुर्ला येथील भाजपचे नगरसेवक हरिष भांदीग्रे यांनी कुर्ला पश्चिम येथील सुंदर नगर, खाडी परिसर आदी भागांमध्ये तीन महिन्यांपासून दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. या दूषित पाण्यामुळे स्थानिक रहिवाशांना पोटाचे आजार होवू लागले असून स्थानिक डॉक्टरांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. प्रत्येक घरातून आता असे रुग्ण आढळून येवू लागले आहेत. त्यामुळे या भागाला पाण्याचा पुरवठा करण्याठी भूमिगत पाण्याची टाकी बांधणे प्रस्तावित आहे. याची सॉईल टेस्टही झाली आहे. पण याचे पुढील काम मात्र अद्यापही बंद असल्याची खंत व्यक्त करत यासाठीचे काम तातडीने हाती घेण्याची मागणी भांदीग्रे यांनी केली. यावर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी हा हरकतीचा मुद्दा राखून ठेवत या भागातील दूषित पाणी समस्या सोडवण्याचे निर्देश जलअभियंता विभागाला दिले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.