नगरसेवकांना पडला प्रश्न, कुणासमोर फोडायचे डोकं?

उद्यानाच्या नुतनीकरणाच्या कामाचे भूमीपूजन होवून आठ महिने उलटत आले, तरी कामाला प्रत्यक्षात सुरुवात झालेली नाही.

92

मुंबई महापालिकेच्यावतीने उद्यान, मैदान व मनोरंजन मैदानासाठी वाहतूक बेटांच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी मागवलेल्या कंत्राटदारांनी ४० टक्क्यांपेक्षा कमी दराने बोली लावल्याने निविदा रद्द करत त्यांच्या अनामत रक्कम जप्त करण्यात आली. परंतु दुसरीकडे उद्यानाच्या नुतनीकरणाच्या कामाचे भूमीपूजन होवून आठ महिने उलटत आले, तरी याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झालेली नाही. त्यामुळे कमी बोली लावून कामे मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई करणारे महापालिकेचे उद्यान विभाग आता अशा कामचुकार कंत्राटदारावर काय कारवाई करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

भूमीपुजन झाल्यानंतर अद्याप उद्यानाच्या विकासाकडे पाहिले नाही!

अंधेरी पूर्व येथील सहार रोड नित्यानंद शाळेशेजारी उद्यानासाठी आरक्षित असलेल्या दोन भूभागाचा विकास करण्यासाठी महापालिकेने निविदा मागवून याबाबतचा प्रस्ताव मार्च २०२०मध्ये स्थायी समितीमध्ये सादर केला. हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर कोविडची लाट आल्याने कंत्राटदाराला कार्यादेश प्राप्त झाले नाहीत. आधी कंत्राटदाराला कार्यादेश मिळायला विलंब झालेला असताना स्थानिक भाजप नगरसेवक अभिजित सामंत यांच्या प्रयत्नानंतर २०२०च्या वर्षअखेर त्यांना कार्यादेश देण्यात आला. त्यानंतर या उद्यानाच्या नुतनीकरणाच्या कामाचे भूमीपुजन २५ डिसेंबर २०२० रोजी करण्यात आले. परंतु भूमीपुजन झाल्यानंतर आजतागायत कंत्राटदाराने या उद्यानाच्या विकासाकडे पाहिले नसून अशा कंत्राटदारांवर आता महापालिका काय कारवाई करणार आहे, असा प्रश्न आता नगरसेवक उपस्थित करत आहेत.

New Project 5 2

(हेही वाचा : निवडणूक कामांसाठी कर्मचारी पाठवण्यास महापालिकेचा नकार!)

भाजप नगरसेवक अभिजित सामंतांनी मांडली कैफियत! 

स्थानिक भाजप नगरसेवक अभिजित सामंत यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता त्यांनी, जानेवारी २०१८पासून या उद्यानाच्या विकासासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले. उद्यानासाठी हे दोन भूखंड राखीव होते. ज्यातील एक ३०वर्षे पडिक होता, दुसरा भूखंड ७ वर्षे पडिक होता. त्यामुळे या दोन्ही भूखंडांच्या जागेवर ८ हजार ८०० चौरस फुट क्षेत्रफळाचे मोठे उद्याने विकसित करण्यासाठी प्रयत्न करत निविदा काढण्यास लावली. त्यानंतर स्थायी समितीत प्रस्ताव संमत झाला. पण कोरोनामुळे कार्यादेश न मिळाल्याने हे काम आधी रखडले होते. त्यानंतर कार्यादेश मिळाल्यानंतर भूमीपुजन झाल्यानंतरही सात महिन्यांपासून हे काम थंड पडलेले आहे. नगरसेवक आपल्या विभागातील कामाकरता जीव तोडून मेहनत करत असतात. पण प्रशासन आणि कंत्राटदार त्यावर पाणी फिरवतात. त्यामुळे जर उद्यान विभागाच्या अतिरिक्त आयुक्त व उद्यान अधिक्षक यांनी उद्यानांच्या देखभालीसाठी मागवलेल्या निविदा कमी बोली लावल्या म्हणून रद्द केल्या आणि त्यांची अनामत रक्कम रद्द केली. त्याचप्रमाणे अशाप्रकारे उद्यान, मैदान आणि मनोरंजन मैदान तसेच क्रीडांगणाच्या विकासासाठी नेमलेल्या कंत्राटदारांकडून कामे होत नसतील तर त्यांच्यावरही कारवाई व्हायला पाहिजे,अशी मागणी सामंत यांनी केली. एका बाजुला उद्यानाच्या नुतनीकरणाची नवीन कामे हाती घेत नाही, परंतु दुसरीकडे जी हाती घेतली आहेत, ती तरी पूर्ण करावी, अशीही कैफियत सामंत यांनी मांडली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.