सफाई कामगारांच्या दूरदृष्टीकडे महापालिकेचे लक्ष

281

मुंबईला स्वच्छ आणि सुंदर राखण्याचे काम करणाऱ्या सफाई कामगारांना अनेक आजारांनी ग्रासले जाते. त्यामुळे त्यांच्या आरोग्याकडे महापालिकेचे लक्ष असले, तरी आता त्यांची दूरदृष्टी वाढवण्याकडेही महापालिकेने पुढाकार घेतला आहे. सफाई कामगारांचा दृष्टीदोष दूर करून त्यांना दूरदृष्टी प्राप्त व्हावी यासाठी महापालिकेने या कामगार वर्गांसाठी विशेष मोफत नेत्र तपासणी शिबिराचा आयोजन केले असून १५ ऑक्टोबरपर्यंत सफाई खात्यातील कर्मचाऱ्यांना या शिबिरात सहभागी होऊन आपले नेत्र दोष निवारण करता येणार आहे.

‘मिशन फॉर व्हिजन’ संस्थेच्या कामगारांसाठी नेत्र तपासणी शिबिर

१३ ऑक्टोबर रोजी जागतिक दृष्टी दिन असून या दिनाचे औचित्य साधून महानगरपालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन खात्याच्या पुढाकाराने आणि ‘मिशन फॉर व्हिजन’ या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने कामगारांसाठी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. या शिबिराचा औपचारिक शुभारंभ अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्या हस्ते आज झाला. महानगरपालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन खात्यातील कामगारांसाठी आयोजित करण्यात आलेले नेत्र तपासणी शिबिर हे सोमवार, १० ऑक्टोबरपासून १५ ऑक्टोबर २०२२ पर्यंत एफ दक्षिण विभागातील व परळ परिसरातील भातनकर महानगरपालिका शाळेमध्ये आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर दररोज सकाळी १० ते दुपारी १.३० या कालावधी दरम्यान कार्यरत राहणार आहे. विशेष म्हणजे या शिबिरातील तपासणीनंतर आवश्यक ते औषधोपचार, चष्मे इत्यादी बाबीदेखील मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत, अशी माहिती घन कचरा व्यवस्थापन खात्यामार्फत देण्यात आली आहे. महानगरपालिका मुख्यालयात सोमवारी झालेल्या या कार्यक्रमाला उप आयुक्त (घन कचरा व्यवस्थापन) डॉ. संगीता हसनाळे, प्रमुख अभियंता (घन कचरा व्यवस्थापन) भारत तोरणे, प्रमुख अभियंता (घन कचरा व्यवस्थापन – प्रकल्प) मिनेश पिंपळे, ‘मिशन फॉर व्हिजन’ या स्वयंसेवी संस्थेच्या एलिझाबेथ कुरियन, श्रीकांत अय्यंगार, केबीएचबी रुग्णालयाचे डॉ. चंद्रशेखर व अशोक गायकवाड आणि संबंधित मान्यवर उपस्थित होते.

(हेही वाचा न्यू टिळक नगरमधील रेल व्ह्यू इमारतीला अग्निशमन दलाची नोटीस)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.