१८ वर्षांवरील नागरीकांच्या लसीकरणासाठी महापालिकेची मोर्चेबांधणी

१८ वर्षांवरील वयोगटातील नागरीकांचे मुंबईतील प्रमाण ९० लाखांच्या आसपास आहे. त्यांचे लसीकरण करणे आव्हानात्मक असेल.

कोविड प्रतिबंध लसीकरण मोहिमेत पुढचा टप्पा म्हणून १८ वर्षांवरील वयोगटातील नागरिकांचे लसीकरण १ मे २०२१ पासून करण्यात येणार आहे. मुंबईत या वयोगटातील नागरिकांची संख्या सुमारे ९० लाख इतकी आहे. या पार्श्वभूमीवर, लसीकरणासाठी पुरेशी शीतसाखळी, जागा व मनुष्यबळ आदी निकषांची पूर्तता करीत असलेल्या खासगी वैद्यकीय केंद्रांनी लसीकरण केंद्र नोंदणीसाठी मुंबई महानगरपालिकेकडे अर्ज करावेत, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य खात्याने केले आहे.

१ मे २०२१ पासून लसीकरणाचा निर्णायक टप्पा सुरू होणार

मागील १६ जानेवारी २०२१ पासून कोविड लसीकरण मुंबईसह भारतात सुरू झाले. त्या अंतर्गत आरोग्य कर्मचारी, आघाडीवर काम करणारे इतर कर्मचारी आणि ४५ वर्ष व त्यापेक्षा अधिक वयाचे नागरीक यांचे टप्याटप्प्याने लसीकरण करण्यात आले व येत आहे. या साखळीतील पुढचा तसेच निर्णायक टप्पा आता १ मे २०२१ पासून सुरू होणार आहे. या टप्प्याअंतर्गत १८ वर्षांवरील वयोगटातील नागरीकांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

(हेही वाचा : दिलासादायकः मुंबईत सलग दुस-या दिवशी रुग्णांची संख्या घटली!)

मुंबईतील ९० लाखांचे होणार लसीकरण! 

या वयोगटातील नागरीकांचे मुंबईतील प्रमाण ९० लाखांच्या आसपास आहे. त्यांचे लसीकरण करणे आव्हानात्मक असेल. या अनुषंगाने खासगी लसीकरण केंद्राचा सदर टप्प्यात अत्यंत मोलाचा सहभाग असणार आहे. यास्तव खासगी लसीकरण केंद्रात पात्र अर्हता असलेल्या खासगी लसीकरण केंद्रांनी आपले अर्ज नोंदणीसाठी आपल्या विभागातील वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयात देणे आवश्यक आहे. त्यानंतर या खासगी लसीकरण केंद्राची नोंदणी कोविन पोर्टलवर करणे सुलभ होईल अधिक माहितीसाठी आपल्या विभागातील वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयात संपर्क साधावा, असे कार्यकारी आरोग्य अधिकारी यांनी कळविले आहे.

लसीकरणासाठी या चार अर्हता पूर्ण कराव्या लागतील!

  • प्रत्येक लसीकरण केंद्रात लस साठवणुकीसाठी पुरेशी शीतसाखळी उपकरणे असणे आवश्यक आहे.
  • लसीकरण केंद्रात लाभार्थ्यांसाठी पुरेशी जागा असणे आवश्यक आहे.
  • लसीकरणासाठी आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ आवश्यक आहे.
  • लसीकरणामुळे प्रतिकूल घटना घडल्यास त्यावर योग्य उपचारांची व्यवस्था असणे आवश्यक आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here