यंदाचा श्रीगणेशोत्सव पर्यावरणपूरक…महापालिका प्रशासनाने हे उचलले पाऊल

120

यंदाच्या वर्षी १९ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर २०२३ या दरम्यान सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होणार आहे. हा गणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरण पूरक व्हावा आणि केंद्र व राज्य शासनाद्वारे देण्यात आलेल्या विविध सूचनांचे परिपूर्ण पालन करून साजरा व्हावा, असे संयुक्त आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘परिमंडळ २’ चे उपायुक्त तथा गणेशोत्सव समन्वयक रमाकांत बिरादार यांनी केले.

मुंबई महानगरपालिकेद्वारे आयोजित एका विशेष बैठकीदरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या बैठकीला मुंबई पोलीस दलातील उपायुक्त अकबर पठाण आणि महाराष्ट्र राज्याच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे राज्य समन्वयक डॉ. सुभाष दळवी हे देखील विशेषत्वाने उपस्थित होते. त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त अजितकुमार आंबी यांच्यासह मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे एडव्होकेट नरेश दहिबावकर, अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघाचे सुरेश सरनोबत यांच्यासह गणेश मंडळाच्या विविध संघटनांचे व मूर्तिकार संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व मुंबई पोलीस दल यांचे अधिकारी व कर्मचारी देखील या बैठकीला उपस्थित होते.

(हेही वाचा संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातच मिळणार मराठीला अभिजात दर्जा)

आज आयोजित करण्यात आलेली विशेष बैठक ही केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे लागू करण्यात आलेल्या ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या (पीओपी) मूर्तींवरील बंदीच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या सुरुवातीला उपायुक्त रमाकांत बिरादार यांनी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांची माहिती उपस्थितांना दिली. त्यावर बैठकीला उपस्थित असणाऱ्या विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी सविस्तर साधक – बाधक चर्चा केली. या चर्चेतील मुद्दे हे राज्य शासनाकडे सादर करण्यात येतील, असे रमाकांत बिरादार यांनी बैठकीदरम्यान नमूद केले

त्यानंतर स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) चे नवनियुक्त ‘राज्य समन्वयक’ डॉ. सुभाष दळवी यांची राज्यस्तरावर नेमणूक झाल्याबद्दल उपस्थित विविध संस्थांच्या प्रतिनिधींद्वारे त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी श्री गणेशोत्सव मंडळाच्या प्रतिनिधींनी डॉ. दळवी यांनी श्रीगणेशोत्सवा दरम्यान केलेल्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. डॉ. दळवी यांनी सुमारे ३० वर्षांपूर्वी मुंबईत यशस्वीपणे राबविलेली निर्माल्य कलश योजना ही आज देशभरात राबविली जात असल्याचा आवर्जून व गौरवपूर्ण उल्लेख गणेशोत्सव मंडळाच्या प्रतिनिधींनी आजच्या बैठकीदरम्यान करत डॉ. दळवी यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. दळवी यांनी पर्यावरण पूरकतेचे आणि स्वच्छतेचे महत्व अनन्य साधारण असल्याचे सांगत यंदाचा गणेशोत्सव हा अधिकाअधिक पर्यावरण पूरक पद्धतीने व अधिकाधिक स्वच्छतेसह साजरा करण्याचे आवाहन उपस्थितांना केले.

कार्यक्रमाच्या अखेरीस उपस्थितांशी संवाद साधताना अकबर पठाण यांनी आपल्या साध्या सोप्या शैलीमध्ये नियम आणि कायद्याचे महत्त्व उपस्थितांना समजावून सांगितले. तर सहाय्यक आयुक्त अजितकुमार आंबी यांच्या आभार प्रदर्शनाने या बैठकीची सांगता झाली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.