कोरोनाला रोखण्यासाठी कुठला मास्क वापरायचा यावरून जनतेच्या मनात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाच्या आजारानंतर तब्बल एक वर्षांनी मुंबई महापालिकेने एन९५ मास्क आणि सर्जिकल मास्क यापासून सुरक्षा मिळत असल्याचा दावा करत जनतेला अशाप्रकारचेच मास्क लावण्याचे आवाहन केले आहे. मात्र, दुसरीकडे या मास्कचा वापर वैद्यकीय सेवा पुरवणारे आरोग्य विभागातील कर्मचारी व अधिकारी तसेच फ्रंटलाईन वर्करसाठी आवश्यक आहे. पण सामान्य जनतेला या मास्कची गरजच नाही, असे मत वर्तवले जात आहे. त्यातच टास्क फोर्सच्या अधिकाऱ्यांनीही कोणताही कापडी मास्क चालू शकतो, पण तो परिपूर्ण असा नाकापासून ते हनुवटीपर्यंत झाकले गेले पाहिजे, असे मत नोंदवले आहे. त्यामुळे महापालिकेच्या या आवाहनामुळेच आता मास्कबाबत गोंधळात गोंधळ निर्माण झालेला आहे.
महापालिकेकडूनच संभ्रम!
मुंबई महापालिकेच्यावतीने मागील सहा दिवसांपूर्वी आपले मास्क कसे असावे याबाबतचा संदेश देताना कापडी मास्क हे असुरक्षित असल्याचे म्हटले आहे. तर एन ९५ मास्क आणि सर्जिकल मास्क हेच ९५ टक्के सुरक्षित असल्याचे नमूद करत याच मास्कचा वापर करण्याचे आवाहन केले. त्यानंतर दोनच दिवसांमध्ये महापालिकेने १८ वर्षांवरील व्यक्तींसाठी लसीकरण केंद्र सुरु करताना जी काही मार्गदर्शक तत्वे सुरु केली आहे, त्यामध्ये लसीकरण केंद्रांवर येताना आणि वावरताना एकावर एक असे दोन मास्क परिधान करावेत, असे आवाहन केले आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटायला लागल्या आहेत.
(हेही वाचा : दादर केले साफ… फेरीवाल्यांमध्ये ‘नव्या’ अधिकाऱ्याची दहशत)
सोशल मीडियावर महापालिकेविरोधात टीका!
महापालिकेच्या आवाहनानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त होवू लागल्या आहेत. यामध्ये त्यांनी महापालिकेचाच समाचार घेतला आहे. महापालिकेचे डोके ठिकाणावर नाही बहुतेक असे म्हणत एक पोस्ट करण्यात आली आहे. यामध्ये त्या पोस्ट लिहिणारी व्यक्ती म्हणते, लोकांचा एक मास्क घालून जीव जातोय आणि हे म्हणतात दोन मास्क लावा. एक सर्जिकल तीन थरांचा मास्क सुध्दा पुरेसा आहे…दोन मास्क घालून तो माणूस नीट जगेल तरी काय? २ मिनिट जरी श्वास कोंडला तरी माणसाचा जीव जातो…उगाच लोकांना घाबरवण्याचे काम बंद केले पाहिजे. आता… एन ९५ फक्त जे कोविड रुग्णाच्या संपर्कात काम करताना किंवा हॉस्पिटलमध्ये काम करतात, त्यांनी लावले पाहिजे… एन ९५ मास्क खपवण्याचा नवीन धंदा चालू केलाय का, असा प्रश्न पडायला आता… अशाप्रकारे पोस्ट करत नागरीकांनी महापालिकेच्या आवाहनावर नाराजी व्यक्त केली.
काय म्हणतात तज्ज्ञ?
यासंदर्भात कोविड टास्क फोर्सचे सदस्य व केईएम रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ संजय ओक यांच्याशी संपर्क साधला ते म्हणतात, साधरणत: कोणताही कापडी मास्क आपण लावू शकता. त्याला काहीच हरकत नाही, पण मास्क हे नाक आणि हनुवटीपर्यंतच पूर्ण झाकले जाईल, असेच लावले गेले पाहिजे. बऱ्याच लोकांचे मास्क नाकावरून खाली घरंगळून फक्त चेहऱ्यावर आलेले असते. म्हणजे ओठांवर असते. ते बरोबर नाही. मास्क रोजचा रोज धुवावा आणि एकाचा दुसऱ्याने अजिबात वापरु नये. या गाष्टी मात्र पाळल्या गेल्या पाहिजे, असे डॉ. ओक यांचे म्हणणे आहे.