कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झाल्यांनतर पुन्हा एकदा रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात आणायचा प्रयत्न महापालिका प्रशासनाच्यावतीने होत आहे. यासाठी महापालिकच्यावतीने उपाययोजना राबवल्या जात असल्या तरी नगरसेवकांकडेही या मदतीची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर मागील आर्थिक वर्षाप्रमाणे कोरोनाच्या आजारावर खर्च करण्यासाठी नगरसेवक निधी वापरण्याची मागणी नगरसेवकांकडून होत आहे. नगरसेविका सोनम मनोज जामसूतकर यांनी पुन्हा १५ लाख रुपयांचा निधी कोरोना आजारासाठी वापरताना सॅनिटायझर, मास्क तसेच इतर तत्सम वस्तूंसह ऑक्सिजन कॉन्संट्रेटर खरेदीला परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. तर भाजप नगरसेवक अभिजित सामंत यांनीही नगरसेवक निधीतून ऑक्सिजन कॉन्संट्रेटर खरेदी नगरसेवक निधीतून करण्याची परवानगी आयुक्तांकडे मागितली आहे.
सॅनिटायझर, मास्क, हातमोजे खरेदीसाठी परवानगी द्यावी!
मुंबईत वाढत्या रुग्ण संख्येमुळे महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेसह महापालिकेच्या यंत्रणेवरही ताण येत आहे. बरेच रुग्ण हे घरीच उपचार घेत आहेत. त्यामुळे या रुग्णांचे घर सॅनिटाईझ करण्यासाठी महापालिकेचे पथक आठ ते दहा दिवसांनी पोहोचते. त्या तुलनेत नगरसेवकांच्या माध्यमातून बाधित रुग्णाची माहिती मिळाल्यानंतर त्याच दिवशी केले जावू शकते. त्यामुळे मागील आर्थिक वर्षात ज्याप्रकारे सॅनिटायझर, मास्क तसेच हातमोज्यास इतर साहित्य घेण्यासाठी नगरसेवक निधीतून सर्वप्रथम १० लाख व त्यानंतर ५ लाख याप्रमाणे १५ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यास परवानगी दिली होती, त्याचप्रमाणे या दुसऱ्या लाटेत वाढत्या कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी नगरसेवकांना सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात आपल्या निधीतून खर्च करण्याकरता परवानगी दिली जावी. तसेच सध्या अनेक रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. त्यामुळे नगरसेवक निधीतून ऑक्सिजन कॉन्संट्रेटर खरेदी करण्याचीही परवानगी दिली जावी, असे पत्र माझगावमधील नगरसेविका सोनम मनोज जामसूतकर यांनी महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना सोमवारी दिले आहे.
( हेही वाचा : मुंबईत मंगळवारी दिवसभरात ७३८१ रुग्ण, ३५ रुग्णांचा मृत्यू!)
महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पत्र पाठवले!
तर भाजपचे विलेपार्ले येथील नगरसेवक अभिजित सामंत यांनीही महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पत्र पाठवून नगरसेवक निधीतून ऑक्सिजन कॉन्संट्रेटरची खरेदी करण्यास परवानगी द्यावी, असे पत्र दिले आहे. सामंत यांनीही आपल्या पत्रात प्रत्येक नगरसेवकास त्यांच्या प्रभागात कोरोनाबाधित किंवा तत्सम लक्षणे असलेल्या व ऑक्सिजनचा आधार असणाऱ्या नागरीकांना ऑक्सिजन कॉन्संट्रेटर ठराविक काळाकरता नगरसेवक निधीतून याची खरेदी करण्यासाठी परवानगी द्यावी, असे म्हटले आहे. मागील वर्षी कोरोनाचा कहर सुरु झाल्यानंतर सर्वाधित रुग्ण हे के-पूर्व विभागात होते. त्यामुळे के-पूर्व विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी सर्व नगरसेवकांच्या प्रभागात अशाप्रकारे ऑक्सिजन कॉन्संट्रेटर उपलब्ध करून दिले होते. ज्याचा चांगल्याप्रकारे उपयोग के पूर्व मधील नगरसेवकांना झाला होता.
गरजूंना अन्न पाकिटे महापालिकेने स्वत: उपलब्ध करून द्यावीत!
कोविड निर्बंधाच्या काळात तृतीयपंथीय, शरीर विक्रय करणाऱ्या महिला तसेच गरीब व गरजू कुटुंबाना अन्न पाकिटे उपलब्ध करून देण्याची मागणी नगरसेविका सोनम मनोज जामसूतकर यांनी आयुक्तांकडे केली आहे. राज्यात कडक निर्बंध लागू करून कलम १४४ लागू केले. यामध्ये केवळ अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने व आस्थापने तसेच कंपन्या बंद ठेवण्याचे निर्देश आहेत. त्यामुळे हातावर पोट असलेल्या गरीब गरजू लोकांची मोठी गैरसोय झालेली आहे. त्याामुळे ही अन्न पाकिटे महापालिकेने स्वत: उपलब्ध करून द्यावीत किंवा नगरसेवक निधीतून ही पाकिटे वाटप करण्यास परवानगी दिली जावीत, अशी सूचना त्यांनी केली आहे.
Join Our WhatsApp Community