मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमधील १६ ठिकाणी ऑक्सिजन प्लांटच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर आता जंबो कोविड सेंटरमध्येही ७० ऑक्सिजन प्लांट उभारण्याची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहे. यामध्ये पुन्हा एकदा हायवे कंस्ट्रक्शन कंपनी पात्र ठरली आहे. एकूण चार ग्रुपसाठी काढलेल्या निविदेमध्ये ३५ ऑक्सिजन प्लांटची कामे हाय वे कंस्ट्रक्शनला देण्यात येणार आहे. तर उर्वरीत ३५ कामांसाठी जीएसएन असोशिएट्स ही कंपनी पात्र ठरली असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, या निविदा काढल्यानंतर ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी अनेक कंपन्यांनी सीएसआर निधी देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे याचा अभ्यास करून ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणाऱ्या कोविड सेंटरचा आकडा कमी केला जाणार असल्याचे बोलले जात आहे.
मुंबई महापालिकेच्यावतीने वरळी डोम, वांद्रे कुर्ला संकुल, नेस्को, भायखळा, दहिसर, मुलुंड आदी ठिकाणी जंबो कोविड सेंटर उभारण्यात आले आहेत. या ठिकाणी सध्या ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था असली तरी कायमस्वरुपी ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सध्या कोविडची रुग्ण संख्या कमी झाल्याने विद्यमान कोविड सेंटर बंद करून त्यांच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात आली आहे. त्याअनुषंगाने ऑक्सिजन वाहिन्यांच्या जोडणीही करण्यात येत आहे.
(हेही वाचा : मुंबईतील उद्यान, मैदानांची विकासकामे आता प्राधान्य क्रमानुसारच!)
३२० कोटी रुपयांच्या खर्चाच्या निविदा मागवल्या!
कोविडच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना याची बाधा अधिक होण्याची भीती वर्तवली जात आहे. त्यामुळे त्यादृष्टीकोनातून ऑक्सिजन बेड, व्हेंटीलेटर्स तसेच आयसीयू बेडसची संख्या अधिक वाढवावी लागणार असल्याने ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारण्याकडे महापालिकेने लक्ष दिले आहे. सुमारे ३२० कोटी रुपयांच्या अंदाजित खर्चाच्या निविदा मागवण्यात आल्या आहेत. यामध्ये एकूण ७० ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारले जाणार असून या सर्वांमधून १ लाख ३ हजार ४६० एलपीएम एवढ्या ऑक्सिजन वायूची निर्मिती होणे अपेक्षित मानले जात आहे. याशिवाय या १२ ठिकाणी ७० प्लांट उभारताना २३ अतिरिक्त कॉम्प्रेसर देण्याचीही अट या निविदेत घालण्यात आली आहे.
कंत्राटातून ‘ते’ ऑक्सिजन प्लांट वजा करणार!
याबाबत मागवण्यात आलेल्या निविदेची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असून यामध्ये दोन कंत्राटदार कंपन्या पात्र ठरल्या आहेत. एकूण चार गटांपैकी दोन्ही कंपन्यांना प्रत्येकी दोन- दोन गटांची कामे विभागून देण्याचे निश्चित झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र, मागील काही दिवसांमध्ये सीएसआर निधीमधून कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आले आहे. त्यामुळे ही कामे निविदेत पात्र ठरलेल्या कंत्राटदारांच्या यादीतून वगळणे तसेच नव्याने अनेक कंपन्या यासाठी सीएसआर निधीतून प्लांट उभारुन देण्यास पुढे येत असल्याने कंत्राटातील प्रस्तावित कामांमधून अनेक कामे वजा करावी लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक गटांसाठी त्यातील प्रत्येक कामांसाठी कंत्राटदाराने बोली लावलेली असून ज्या ठिकाणची कामे सीएसआर निधीतून झाली आहेत, त्या कामांचे कंत्राट न देता उर्वरीत कामे देण्याच्यादृष्टीने विद्युत व यांत्रिकी विभागाच्यावतीने अभ्यास सुरु आहे. त्यामुळे एका बाजुला निविदा अंतिम करण्याचे काम सुरु असले तरी दुसरीकडे अनेक कामे वगळण्यात येणार आहे. त्यामुळे आता वगळलेल्या कामांचा खर्च वजा करून उर्वरीत कामांच्या निविदांनुसार प्रस्ताव बनवला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
‘त्या’ १६ ऑक्सिजन प्लांटच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप!
वरळी एनएससीआय, मालाड, गोरेगाव नेस्को, कांजूरसह सह काही कोविड सेंटरमध्ये प्लांट उभारण्यास अनेक कंपन्यांनी सीएसआर निधी देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे निविदा काढल्यानंतर या कंपन्यांनी तयारी दर्शवल्यामुळे पात्र कंपन्यांची कामे कमी जाणार आहे. मात्र, ज्या कंपनी यापूर्वी दिलेल्या कंत्राटानुसार १ महिन्यांमध्ये रुग्णालयांमध्ये १६ ठिकाणी ऑक्सिजन प्लांट उभारले नाही, त्यांना पुन्हा कशाच्या आधारे ३० ते ३५ कामे दिली जात आहेत, असा सवाल भाजपचे महापालिका पक्षनेते विनोद मिश्रा यांनी केला. १६ ऑक्सिजन प्लांटमध्ये मोठा भ्रष्टाचार आहे. याबाबत आम्ही तेव्हा ही बाब मांडली होती. परंतु कोविड रुग्णांना तातडीने सेवा मिळावी म्हणून आम्ही नरमाईची भूमिका घेतली असली तरी हे प्लांट वेळेत सुरु झाले नाही तर आम्ही रस्त्यांवर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही मिश्रा यांनी दिला. प्रशासनातील अधिकाऱ्यांना हाय वे ही एकमेव कंपनी जवळची वाटत असून त्या कंपनीसाठी अधिकारी काम करतात की काय अशी शंका निर्माण होत असल्याचेही मिश्रा यांनी सांगितले.
सीएसआर निधीतून उभारण्यात येणाऱ्या प्लांटची पडताळणी सुरु!
संदर्भात विद्युत व यांत्रिक विभागाचे प्रमुख अभियंता कृष्णा पेरेकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी कोविड सेंटरमधील ऑक्सिजन प्लांटच्या निविदाची प्रक्रिया सुरु असल्याचे सांगितले. अनेक कोविड सेंटरमध्ये रुग्णांची संख्या कमी आहे. तसेच महापालिकेला काही ठिकाणी आता सीएसआर निधीतून प्लांट उभारुन दिले जात आहे. त्यामुळे कोणत्या कोविड सेंटरमध्ये अशाप्रकारे सीएसआर निधीतून प्लांट उभारले जात आहे, याचा इतिहास तपासून तथा अभ्यास करून त्यानुसार प्रस्ताव तयार केला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
(हेही वाचा : ‘ते’ दोन मौलवी अवैध मदरसेही चालवायचे! मुलांमध्ये हिंदुद्वेष पेरायचे!)
Join Our WhatsApp Community