कोरोना नियंत्रणाबाबत महापालिका हतबल : जनतेवर सोपवली जबाबदारी!

मुंबईकर नागरिकांचे पूर्वीप्रमाणे सक्रिय सहकार्य मिळाले, तरच कोरोनावर पुन्हा नियंत्रण आणणे शक्य आहे. कारण यासाठी मुंबईकरांना अधिकाधिक स्वयंशिस्तीची गरज आहे, असे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल म्हणाले.

78

मुंबईत कोरोनाचा संसर्ग अति झपाट्याने होत असताना महापालिका प्रशासन मात्र हतबल ठरलेले आहे. कोरोना नियंत्रणासाठी नागरिकांनी आता नव्या जोमाने स्वतःहून काही गोष्टी अंगीकारणे गरजेचे असल्याचे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले आहे. मागील वर्षापासून मुंबई महानगरपालिकेने कोरोना नियंत्रणासाठी अनेक उपाय योजना राबविल्या आहेत. तसेच विविध स्तरीय जाणीवजागृती सह अनेक धोरणात्मक निर्णय घेतलेले आहेत. मात्र जगात या संसर्गजन्य आजारावर तात्काळ तोडगा असणारे औषध अद्यापही आलेले नसल्याचे सांगत महापालिका प्रशासनाने नागरिकांना स्वत:हून काही गोष्टी अंगिकारण्याच्या सूचना करत ही हतबलता वर्तवली आहे.

रुग्ण संख्या पूर्वीपेक्षा तिप्पट झाली!

मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी जनतेला आवाहन करताना, आपण सर्वजण गेले वर्षभर कोरोना विरोधाची लढाई लढत आहोत. दोन महिन्यांपासून आपल्या मदतीला लसही आलेली आहे. परंतु यामुळे लगेच दिलासा मिळेलच असे नाही. परंतु विविध कारणांमुळे आपल्यापैकी अनेकांच्या दैनंदिन व्यवहारात ‘कोरोना’ प्रतिबंधाबाबत शिथिलता आलेली दिसते. मुंबईत त्याचे दुर्दैवी परिणाम दिसायला लागले आहेत. रुग्ण संख्या ही पूर्वीपेक्षा तिप्पट होत आलेली आहे. शासनाच्या मदतीने मुंबई महापालिका या संकटाला सामोर जाण्यासाठी पुन्हा समर्पित झालेली आहे. परंतु यात मुंबईकर नागरिकांचे पूर्वी प्रमाणे सक्रिय सहकार्य मिळाले, तरच या संकटावर पुन्हा नियंत्रण आणणे शक्य आहे. कारण यावर नियंत्रण मिळविण्यासाठी मुंबईकरांना आज अधिकाधिक स्वयंशिस्तीची गरज आहे. मुंबईकर यात कुठेही कमी पडणार नाही, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला आहे.

(हेही वाचा : कोरोनाग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांची होतेय दमछाक! )

वैयक्तीक, कौटुंबिक, सार्वजनिक आयुष्‍यात नवीन बदलांचा अवलंब करा!

‘कोरोना’ या संसर्गावर प्रतिबंधात्मक औषध उपचार आणि हमखास असा तोडगा सापडून कोरोनावर संपूर्ण नियंत्रण येईपर्यंत, आपल्या सर्वांमध्ये आलेली जीवन शैलीमधील शिथिलता आता बदलून नव्याने काही बदल करणे सर्वांनाच आवश्‍यक झाले आहे. तोंडावर मास्‍कचा नियमित वापर, सुरक्षित शारीरिक अंतर, वारंवार साबणाने हात धुणे नि निर्जंतुकीकरणाचा वापर याच्‍यापलीकडे जाऊन आता वैयक्तीक, कौटुंबिक तसेच सार्वजनिक आयुष्‍यात नवीन बदलांचा अवलंब करणे अत्यंत आवश्‍यक झाले आहे. अशा बदलांचा स्‍वीकार करुन, या माध्‍यमातून कोरोनावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात राज्यभरात कृती आराखड्यांची अंमलबजावणी सुरू आहे.

जाणीव-जागृती मोहिमा राबविण्यात येतात!

मुंबई महापालिका क्षेत्रात राबविण्यात येत असलेल्या जाणीव-जागृती मोहिमा या राज्‍यव्‍यापी मोहिमांचा एक भाग आहे. मुंबईकर नागरिकांसह सर्व लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने व स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाने राबविण्यात येणा-या या मोहिमेत प्रभावी कोविड नियंत्रणासाठी नवीन जीवनशैली पद्धतीचा अवलंब करण्यास अधिकाधिक व्यक्तींना प्रेरित करणे, हा या दोन्ही मोहिमांचा मुख्‍य भाग आहे. कोविड नियंत्रणासाठी अधिक प्रभावी आरोग्य शिक्षण साधणे, हे त्‍याचे मुख्‍य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.