हिंदमाता सिनेमा चौकात तुंबणाऱ्या पाणी समस्येवर मात करण्यासाठी दादरमधील प्रमोद महाजन कला पार्क आणि परळमधील सेंट झेवियर्स मैदानावर पावसाळी पाण्याच्या साठवण टाकी बनवण्यात येत आहे. यातील पहिल्या टप्प्यात २५ टक्के क्षमतेच्या दोन टाक्या बनवण्याचे काम पूर्ण झाले आहे. हे काम अत्यंत घाईगडबडीत करताना टाक्यांचे आच्छादनच करण्यास महापालिका विसरली आहे. त्यामुळे बांधण्यात आलेल्या टाक्यांचे आच्छादन आणि विस्तारीत १.९९ कोटी लिटर क्षमतेच्या टाकीचे काम आच्छादनासह हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी विविध करांसह सुमारे ३५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.
रेल्वे मार्गाखालून भूमिगत पर्जन्य जलवाहिनी टाकण्याचा निर्णय
दरवर्षी हिंदमातासह दादर परिसरात पावसाचे पाणी तुंबले जाते. परिणामी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. येथील पावसाच्या पाण्याचा निचरा जलदगतीने व्हावा यासाठी सर्वप्रथम ब्रिटानिया ऑऊटफॉल पंपिंग स्टेशनचे बांधकाम करण्यात आले. त्यानंतर या भागातील पर्जन्य जलवाहिन्या बदलून त्यांची क्षमताही वाढवण्यात आली आहे. परंतु पाण्याचा निचरा होऊन येथील तुंबणाऱ्या पाण्याची समस्या न मिटल्याने अखेर येथील दादर पश्चिम येथील प्रमोद महाजन कला पार्क आणि परेल येथील सेंट झेवियर्स येथील मैदानात भूमिगत टाक्या बांधून त्यामध्ये साठवणूक करण्याचा निर्णय घेतला. या साठवण टाकींमध्ये पाणी वाहून नेण्यासाठी रेल्वे मार्गाखालून भूमिगत पर्जन्य जलवाहिनी टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
(हेही वाचा आशिष शेलारांना धमकी देणारा निघाला ‘ओसामा’)
टाक्या बांधण्याच्या कामाचे कंत्राट ३५ कोटी ३० लाख रुपयांचे निश्चित
त्यामुळे हिंदमाता पुलाखाली मिनी पंपिंग स्टेशन बनवून तेथून हे पाणी साठवण टाकीपर्यंत नेण्यासाठी १२०० व १६०० मि.मी क्षमतेच्या दोन पर्जन्य जलवाहिनी टाकून महाजन पार्कमध्ये ६ कोटी लिटर व सेंट झेवियर मैदानात ४ कोटी लिटर क्षमतेच्या टाक्या बांधण्याचा निर्णय घेतला. त्यातील २५ टक्के क्षमतेच्या साठवण टाक्या बांधण्यासाठी आजुबाजुच्या कंत्राटदारांना बोलावून त्यांच्याकडून कामे करून घेण्यात आली. परंतु या टाक्या बांधतांना त्या आच्छादित करून बांधल्या गेल्या नाहीत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात बांधलेल्या या टाक्या आच्छादित करण्यासाठी तसेच विस्तारीत टाक्यांचे बांधकाम हे आच्छादनासह बांधण्यासाठी निविदा मागवण्यात आली होती. यामध्ये योगेश कंस्ट्रक्शन कंपनी ही पात्र ठरली असून त्यांनी महापालिकेच्या अंदाजित दरापेक्षा २० टक्के कमी दर आकारुन बोली लावली आहे. त्यामुळे या कामांसाठी २६ कोटी ३८ लाख रुपयांची बोली लावली असून विविध करांसह हे कंत्राट ३५ कोटी ३० लाख रुपयांमध्ये देण्याचे निश्चित करण्यात आले.
Join Our WhatsApp Community