महापालिकेला एक लाख लस उपलब्ध!

सध्या २४ हजार लशींचा शिल्लक साठा, त्यानंतर प्राप्त झालेल्या एक लाख लशींचा साठा पाहता ९ एप्रिलच्या लसीकरणानंतर महापालिकेकडे १ लाख २४ हजार एवढा साठा शिल्लक आहे.

लशीचा तुटवडा जाणवू लागल्यानंतर मुंबईतील काही लसीकरण केंद्र बंद करण्यात आल्यानंतर शुक्रवारी, 9 एप्रिल रोजी रात्री मुंबई महापालिकेला सुमारे १ लाख लशीचा पुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेसह शासकीय केंद्रावर लसीकरण सुरु होते. खासगी लसीकरण केंद्र शनिवारी व रविवारी बंद ठेवण्यात आली असली, तरी शनिवारी भगवती रुग्णालयांसह काही महापालिकेच्या केंद्रांमध्ये लसीकरण बंद ठेवण्यात आले होते.

पुढील दोन दिवसांचा लशीचा साठा उपलब्ध

महानगरपालिका आणि शासनाच्यावतीने मुंबईत ४९ तर खासगी रुग्णालयात ७१ लसीकरण केंद्रं कार्यान्वित करण्यात आलेली आहेत. या सर्व केंद्रांवर मिळून संपूर्ण मुंबईत प्रतिदिन सरासरी ४० ते ५० हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात येते. परंतु कोविड-१९ लसीचा पुरवठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध न झाल्याने खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रात १०, ११ आणि १२ एप्रिल २०२१ या तीन दिवशी लसीकरण होणार नाही. पण महानगरपालिकेला शुक्रवारी रात्री उशिरा १ लाख लशीचा साठा उपलब्ध झाला असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांचा लशीचा साठा उपलब्ध झाला आहे. संचारबंदी असल्यामुळे शनिवारी व रविवारी लसीकरण होणार का असा प्रश्न असतानाच महापालिकेने महापालिकेसह शासकीय केंद्रे सुरु ठेवली होती. याठिकाणी नोंदणी केलेल्या नागरिकांनी सहभागी होऊन लस घेतली. परंतु महापालिकेच्या बोरीवली येथील भगवती रुग्णालयात लसीकरण थांबवण्यात आले. त्यामुळे रांगेतील अनेक नागरीकांना माघारी फिरावे लागल्याच्या तक्रारी येत होत्या.

(हेही वाचा : पी- उत्तर विभागाला सहायक आयुक्त मिळेना! सर्वाधिक लोकसंख्या असलेला विभाग वाऱ्यावर!)

१ लाख २४ हजार एवढा साठा शिल्लक

७ एप्रिलच्या लसीकरणानंतर १ लाख ४८ हजार १३० लशीचा साठा शिल्लक होता. त्यातील ४४ हजार ८१० लशीचा साठा दुसऱ्या डोससाठी राखीव ठेवण्यात आला होता. त्यामुळे सुमारे १ लाख ४ हजार एवढा शिल्लक होता. त्यानंतर ५१ हजार ४३३ नागरीकांनी पहिला डोस घेतला आणि त्यानंतर ९ एप्रिल रोजी २९ हजार १८७ लोकांनी पहिला डोस घेतला. त्यामुळे लाख ४ हजार लशीपैकी सुमारे ८० ते ८१ हजार लसीकरण् पार पडल्याने सुमारे २४ हजार लशींचा शिल्लक साठा आणि त्यानंतर प्राप्त झालेल्या एक लाख लशीचा साठा पाहता ९ एप्रिलच्या लसीकरणानंतर महापालिकेकडे १ लाख २४ हजार एवढा साठा शिल्लक असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here