महापालिकेने मेट्रो कर्मचाऱ्यांना दिले आपत्ती व्यवस्थापनाचे धडे!

मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्रातील मेट्रो रेल्वेच्या अधिकारी कर्मचा-यांसाठी ४ व ५ जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या प्रशिक्षण कार्यशाळेचा शनिवारी समारोप झाला.

168

महानगरपालिकेचे शहर आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्र आणि आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या अधिका-यांबरोबर बैठकांचे आयोजन करुन प्रशिक्षणाचे स्वरुप, प्रात्याक्षिके दाखविणे व करुन घेणे याबाबत निश्चिती करण्यात आली. त्यानुसार मेट्रो प्रकल्प २ आणि ३ च्या २ हजार ५०० अधिकारी – कर्मचा-यांना याच्या प्रशिक्षणाचे धडे महापालिकेच्या वतीने दिले जाणार आहे. मुंबई मेट्रोच्या कर्मचाऱ्यांसाठी आयोजित आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त प्रभात रहांगदले, मुंबई मेट्रोचे उप महाव्यवस्थापक सचिन पटवर्धन, महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे संचालक महेश नार्वेकर आणि मान्यवर उपस्थित होते.

महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमीटेड यांच्यामार्फत ‘मेट्रो प्रकल्प २’ आणि ‘प्रकल्प ३’ चे काम लवकरच सुरु करण्यात येणार आहे. या अनुषंगाने मुंबई मेट्रो व मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त बैठकांमध्ये मुंबई मेट्रोच्या स्तरावर आपत्कालीन व्यवस्थापन विषयक प्रशिक्षणाची गरज असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्या निदर्शनास आले. त्यानुसार त्यांनी पुढाकार घेऊन ही बाब ‘मुंबई मेट्रो’च्या निदर्शनास आणून‌ दिली. ज्यानंतर आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने प्रशिक्षण देण्याची विनंती मुंबई मेट्रोद्वारे मुंबई महानगरपालिकेला करण्यात आली.

(हेही वाचा : मुंबई लोकल सर्वांसाठी बंदच! लेव्हल ३ची बंधने लागू! )

कोणत्या विषयांवर प्रशिक्षण दिले?

प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये आपत्कालीन व्यवस्थापनाची आवश्यकता, आपत्ती म्हणजे काय, धोक्यांची ओळख, धोके म्हणजे काय, जोखिम कशी ओळखावी, जोखिम म्हणजे काय, आपत्तीचे प्रकार, विविध प्रकारच्या आपत्तीमध्ये, अगोदर, नंतर काय करावे व काय करू नये, आपत्कालीन व्यवस्थापन चक्र (सज्जता, उपशमन, प्रतिरोध तसेच प्रतिसाद ) बृहन्मुंबई महानगरपालिकेतील आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे कार्य, मेट्रो रेल्वे प्रकल्पात काम करीत असताना उद्भवू शकणारे संभाव्य धोके याबबत चर्चा करून त्याबाबतीत सज्जता, उपशमन, प्रतिबंध कसे करावे व घटना घडलीच तर प्रतिसाद कसा द्यावा? आग म्हणजे काय, आगीचे प्रकार, आग लागू नये म्हणून काय नियोजन करावे, रासायनिक व विद्युत आग लागल्यास काय करावे व काय करू नये, तसेच अग्निशमन प्रणाली आणि अग्निशमके हाताळण्याबाबतची प्रात्यक्षिके, प्रथमोपचार म्हणजे काय, प्रथमोपचाराची मार्गदर्शक तत्वे, जखमांचे प्रकार, लक्षणे आणि उपचार, ट्रॉमा व्यवस्थापन तसेच सी.पी.आर. म्हणजे काय? तो कधी व केव्हा द्यावा, इत्यादी बाबत शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात आले.

जखमींना वाहून नेण्याच्या विविध पध्दतींचे शिक्षण दिले!

त्याचबरोबर आणीबाणीच्या प्रसंगी दोराच्या सहाय्याने सुटका, विविध प्रकारच्या गाठी बांधणे, गाठींचे उपयोग, कोणत्या प्रकारची गाठ कोणत्या आणीबाणीमध्ये सुटका करून घेण्यासाठी उपयोगात येवू शकते याची प्रात्यक्षिके, स्ट्रेचर कसे उचलावे, उपलब्ध साधनांपासून सुधारीत स्ट्रेचर कसे बनवावे आणि त्याचा वापर कसा करावा, बँडेजचे प्रकार व सुधारीत बँडेज कसे तयार करावे, उपलब्ध साधनांपासून जखमींना वाहून नेण्याच्या विविध पध्दतींचे शिक्षण प्रात्यक्षिकांसह देण्यात आले. मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्रातील मेट्रो रेल्वेच्या अधिकारी कर्मचा-यांसाठी ४ व ५ जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या प्रशिक्षण कार्यशाळेचा शनिवारी समारोप झाला. यानंतर उर्वरित कर्मचाऱ्यांसाठी बॅचेसमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शहर आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्राद्वारे देण्यात आली आहे.

(हेही वाचा : दुसऱ्या लाटेत उसंती मिळताच कोविड सेंटरची डागडुजी सुरु!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.