गोरेगाव, कांदिवली, बोरीवलीतील सफाई कामगारांच्या वसाहतींचा पुनर्विकास

गोरेगाव जेपी नगर, कांदिवली आकुर्ली रोड आणि बोरीवली बाभई येथे ५५० सदनिका बांधून मिळण्याचा अंदाज असताना केवळ ३७७ सदनिका बांधून मिळणार आहे.

162

मुंबईतील सफाई कामगारांच्या वसाहतींचा पुनर्विकास आश्रय योजनेतंर्गत करण्यात येत असून यापूर्वी काही भागांमधील वसाहतींच्या विकासाला मान्यता देण्यात आल्यांनतर आता गोरेगाव, कांदिवली आणि बोरीवली येथील पाच वसाहतींच्या पुनर्विकासासाठी दोन कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे. या दोन्ही प्रकल्पांमधून ३०० चौरस फुटांच्या सुमारे १७०० सदनिका आणि ६०० चौरस फुटांच्या सुमारे २०० सदनिका बांधण्यात येणार आहे. यावर सुमारे ५५० कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. यामध्ये गोरेगाव जेपी नगर, कांदिवली आकुर्ली रोड आणि बोरीवली बाभई येथे ५५० सदनिका बांधून मिळण्याचा अंदाज असताना केवळ ३७७ सदनिका बांधून मिळणार आहे.

४६२. ९९ कोटी रुपयांची बोली लावली!

डिझाईन आणि बिल्ट टर्नकी गट क्रमांक ७ मध्ये गोरेगाव प्रगती नगर व मिठानगर येथील दोन सफाई कामगारांच्या वसाहतींचा पुनर्विकास करण्यासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. या दोन्ही वसाहतींमध्ये विद्यमान २०८ सदनिका असून कार्यालयाने निविदा मागवताना ९४० सदनिकांचे बांधून देणे अपेक्षित होते. परंतु कंत्राटदाराने ३०० चौरस फुटांच्या १३७१ आणि ६०० चौरस फुटांच्या १४७ सदनिका बांधून देण्याची तयारी दर्शवली आहे. या प्रकल्पासाठी स्काय वे इन्फास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी पात्र ठरली असून त्यांनी ४६२. ९९ कोटी रुपयांची बोली लावली आहे.

१९,९३२ चौ. मीटरच्या क्षेत्रफळावर ५५० सदनिका बांधण्याचा अंदाज 

डिझाईन आणि बिल्ट टर्नकी गट क्रमांक८मधील गोरेगाव जे.पी. नगर, कांदिवली आकुर्ली रोड आणि बोरीवली बाभई या तीन सफाई कामगारांच्या वसाहतींमध्ये एकूण ८८ सदनिका आहेत. याठिकाणी ३०० चौरस फुटांच्या ५१० सदनिका आणि  ६०० चौरस फुटांच्या ४० सदनिका बांधून घेणे अपेक्षित होते. परंतु या प्रकल्प कामांसाठी पात्र ठरलेल्या देव इंजिनिअर्स याठिकाणी अपेक्षित सदनिकांच्या तुलनेत कमी सदनिका बांधून देणार आहे. याठिकाणी ३०० चौरस फुटांच्या ३१७ सदनिका आणि ६०० चौरस फुटांच्या ६० सदनिका बांधून देण्याची तयारी दर्शवली आहे. महापालिकेने एकूण १९ हजार ९३२ चौरस मीटरच्या क्षेत्रफळावर एकूण ५५० सदनिका बांधून देण्याचा कार्यालयीन अंदाज वर्तवला होता. परंतु यासाठी पात्र ठरलेल्या कंत्राटदाराने केवळ २१ हजार ६७६ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेवर केवळ ३७७ सदनिका बांधून देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे महापालिकेच्या अंदाजानुसार आजवर सदनिकांची संख्या वाढलेली असताना याठिकाणी तब्बल १७० सदनिका कमी बांधून देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे एका बाजुला चौरस मीटरचे क्षेफळ अधिक असतानाही सदनिकांची संख्या घटलेलीच पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे म्हणजे या प्रकल्पासाठी किंजल सिव्हिलकॉन या कंपनीने कमी दर आकारला होता. परंतु या कंपनीने गट क्रमांक ९ व  ११ मध्येही कमी बोली लावल्याने ते पात्र ठरले होते. त्यामुळे गट क्रमांक ८मध्ये त्यांच्या ऐवजी दुसऱ्या क्रमांकावरील देव इंजिनिअर्सला काम देण्याचा निर्णय घेतला आहे.

(हेही वाचा : ‘त्या’ रेव्ह पार्टीतून महाविकास आघाडीतील बड्या नेत्याचा मुलगा पळाला!)

गट क्रमांक ८                  

  • गोरेगाव जे.पी.नगर : (३०० चौ.फूट -६५, ६०० चौ.फूट-०)
  • कांदिवली आकुर्ली रोड : (३०० चौ.फूट-१७२, ६०० चौ.फूट-६०)
  • बोरीवली बाभई नाका : (३०० चौ.फूट -८०, ६०० चौ.फूट-०)
  • ३०० चौरस फुटांच्या एकूण सदनिका : ३१७
  • ६०० चौरस फुटांच्या एकूण सदनिका : ६०
  • कंत्राटदार : देव इंजिनिअर्स
  • कंत्राट किंमत : ११८ कोटी रुपये

गट क्रमांक ०७

  • गोरेगाव प्रगती नगर : (३०० चौ.फूट -८६४, ६०० चौ.फूट-९०)
  • गोरेगाव मिठानगर: (३०० चौ.फूट-५०७, ६०० चौ.फूट-५७)
  • ३०० चौरस फुटांच्या एकूण सदनिका : १३७१
  • ६०० चौरस फुटांच्या एकूण सदनिका : १४७
  • कंत्राटदार :  स्कायवे इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड
  • कंत्राट किंमत : ४६२.९९कोटी रुपये
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.