मुंबईतील पहिला स्कायवॉक म्हणून ओळख असलेल्या वांद्रे पूर्व ते वांद्रे न्यायालय आणि कलानगरपर्यंत असणारा स्कायवॉक इतिहास जमा होणार आहे. कोरोनापूर्वी पादचाऱ्यांसाठी बंद करण्यात आलेला हा स्कायवॉक आता पाडण्यात येणार असून त्या जागी आता नव्याने स्कायवॉक उभारण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या स्कायवॉकचा वापर कुणी करत नव्हते, तोच स्कायवॉक बंद करण्यात आल्यानंतर आता पुन्हा तो पाडून नव्याने बांधून एक प्रकारे महापालिकेच्या खर्चाचा चुराडा केला जाणार आहे, असे बोलले जात आहे.
पुनः सर्वेक्षण व्ही.जे.टी.आय. या संस्थेमार्फत करण्यात आले
महापालिकेच्या ‘एच/पूर्व’ विभागामधील वांद्रे स्थानकापासून फॅमिली कोर्टपर्यंत आकाशमार्गिका अर्थात स्कायवॉक हा २००७-०८ मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणा(एमएमआरडीए) मार्फत बांधण्यात आला होता व सन २०१५ मध्ये हे स्कायवॉक महानगरपालिकेकडे हस्तांतरीत करण्यात आला होता. परंतु त्यानंतर या स्कायवॉकचे स्थितीदर्शक व पुनः सर्वेक्षण व्ही.जे.टी.आय. या संस्थेमार्फत करण्यात आला. या स्कायवॉकचे स्ट्रक्चरल स्टीलमध्ये बांधण्यात आल्याने खाडीलगतच्या खराब वातावरणामुळे गंजलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे हा स्कायवॉक सन २०१९ पासून पादचा-यांसाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे या स्कायवॉकचे बांधकाम पाडून त्या जागी पुनर्बांधकाम करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.
(हेही वाचा बायोमेट्रीक हजेरी बंद न झाल्यास येत्या बुधवारपासून कामबंद आंदोलन)
स्कायवॉक केवळ प्रेमी युगलांचा, गर्दुल्यांचा अड्डा बनला
या स्कायवॉकचा वापर बांधल्यापासून कमी असल्याने याचा हेतू साध्य झाला नव्हता. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून एमएमआरडीएच्या संकल्पनेतून बांधलेला हा स्कायवॉक केवळ प्रेमी युगलांचा आणि गर्दुर्ल्यांचा अड्डा बनला होता. परंतु सध्या बंद अवस्थेत या स्कायवॉकच्या जागी नव्याने स्कायवॉक बांधण्यासाठी महापालिकेच्या पूल विभागाने निविदा मागवली होती. मागवलेल्या या निविदेमध्ये एन.ए. कंस्ट्रक्शन कंपनीने विविध करांसह १८.६९ कोटी रुपयांमध्ये काम मिळवले आहे.
स्कायवॉक पुनर्बांधकाम १८ महिन्यांमध्ये पूर्ण होईल
कामांचे कार्यालयीन अंदाजपत्रक १६.२० कोटी रकमेचे तयार करण्यात आले होते, परंतु यामध्ये एन.ए. कन्स्ट्रक्शन कंपनीने १५ टक्के कमी दर आकारुन १४ कोटी २५ लाख रुपयांसह विविध करांसह १८ कोटी ६९ लाख रुपयांध्ये कंत्राट देण्यात आले आहे. महापालिकेच्या पूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या स्कायवॉक उद्वाहक अर्थात एस्केलेटर बसवण्यात येणार आहे. तसेच या स्कायवॉकमुळे वांद्रे पूर्वेकडील फॅमिली कोर्ट, एसआरए कार्यालय आणि म्हाडा येथील कर्मचा-यांना ये-जा करण्याकरिता सोयीचे होईल. हे काम कार्यादेश दिल्यानंतर १८ महिन्यांमध्ये पूर्ण होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community