कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा म्हणून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसह बँक, रेल्वे आदी कर्मचाऱ्यांना रेल्वे सेवेसह अन्य ठिकाणी प्रवास खुला करण्यात आला होता. तसेच लॉकडाऊनच्या काळात याच अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांना कामावर येण्या-जाण्यासाठी मुभा होती. ही बाब लक्षात घेवून अनेकांनी मुंबई महापालिकेची बोगस ओळखपत्रे तयार करून रेल्वेमधून प्रवास करण्याचे प्रकरण ताजे असतानाच आता महापालिका कर्मचाऱ्यांच्या ओळखपत्राला जोडलेली रिबीन चक्क अॅमेझॉनवर विकायला काढल्याचे समोर आले आहे. एवढेच नव्हे, तर महापालिकेसोबत याच अॅमेझॉनवर भारतीय रेल्वेचीही रिबीन विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेची ही रिबीन परस्पर विकत घेवून बोगस ओळखपत्रधारक बिनधास्तपणे फिरायला मोकळे झाले आहेत.
अशा रिबीन फक्त महापालिका मुख्यालयातच मिळतात!
मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्याचे ओळखपत्र वितरीत करताना त्यांना त्यासोबत महापालिकेच्या नावाची रिबीन दिली जाते. ज्याद्वारे महापालिकेचे ओळखत्र कर्मचारी गळ्यात सहज दिसू शकेल, अशा स्वरुपात अडकवू शकतील. अशा स्वरुपाच्या रिबीन या फक्त महापालिका मुख्यालयात सहाव्या मजल्यावर उपलब्ध होत असतात. पण याव्यतिरिक्त जरी ते उपलब्ध झाले तरी ते फक्त महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनाच दिले जाते. परंतु मागील काही दिवसांपासून महापालिका कर्मचाऱ्यांच्या ओळखपत्रासोबत गळ्यात अडकवण्यात दिली जाणारी रिबीन चक्क अॅमेझॉनवर विक्रीस उपलब्ध असल्याचे दिसून येवू लागले. अॅमेझॉनवर या रिबीनची मुख्य किंमत २५० रुपये एवढी आहे. तर २० टक्के सवलत देत ही रिबीन २०० रुपयांना विक्री केली जात आहे. तर इंडियन रेल्वेची रिबीन ही १६९ रुपयांना विक्री केली जात आहे. त्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटू लागली आहे.
(हेही वाचा : गैरसोय नको म्हणून शीव रुग्णालयातील लसीकरण केंद्र दुस-या जागेत)
याआधीही गैरप्रकार घडले!
या रिबीनचा गैरवापर होण्याआधी तातडीने अॅमेझॉन साईटवरील या विक्री विरोधात कारवाई करण्यात यावी. तसेच संबंधित विक्रेत्याला शिक्षा बजावण्यात यावी, अशा प्रकारची मागणीच आता महापालिका कर्मचाऱ्यांकडून सोशल माध्यमांवर होत आहे. काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे महापालिका ओळखपत्रांचे रिबीन हे जीपीओसमोरील पदपथावर विक्रीस ठेवल्याचेही दिसून आले होते. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर महापालिकेच्या ओळखपत्रांची रिबीन कुठेही सहज उपलब्ध होत असताना यावर महापालिकेच्यावतीने कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. काही महिन्यांपूर्वी रेल्वे पोलिस आणि रेल्वे तिकीट तपासनीस यांनी मुंबई महापालिका, मंत्रालय तसेच आरोग्य विभागाशी संबंधित अनेक कंपन्यांची बोगस ओळखपत्रे जप्त केली होती. यामध्ये महापालिकेची बोगस ओळखपत्रे मोठ्या प्रमाणात आढळून आली होती. परंतु यानंतरही महापालिकेने त्या बोगस ओळखपत्रांचा वापर करणाऱ्यांविरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई केली नव्हती.
यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाचे सहआयुक्त मिलिन सावंत यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आपल्याकडे याबाबत तक्रारी आल्यानंतर आम्ही अॅमेझॉनशी इमेलद्वारे तसेच प्रत्यक्ष फोनवर संपर्क साधून त्यांच्या निदर्शनास ही बाब आणून देण्याचा प्रयत्न करत आहोत. सोमवारी पुढील कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
Join Our WhatsApp Community