कोविडमध्ये दिवसरात्र सेवा देणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना यंदा प्रथमच गणेशोत्सवात सुट्टी घेत आपल्या कुटुंबासह उत्सवात सहभागी होता आले आहे. यंदा साजरा होत असलेल्या सर्व निर्बंधमुक्त उत्सवात महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुट्टी घेत आपल्या आप्त परिवारासह गणेशोत्सव साजरा केला जात असताना यंदा प्रथमच मुंबई महापालिका (BMC) २४ तास आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांविना राहणार आहे.
यंदा आयुक्त आणि दोन अतिरिक्त आयुक्त हे सुट्टीवर असून दोन अतिरिक्त आयुक्त जर्मनी दौऱ्यावर भगिनी शहर अंतर्गत होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले आहेत. त्यामुळे रविवारी २४ सप्टेंबर रोजी महापालिकेचे (BMC) आयुक्त व चार अतिरिक्त आयुक्त हे कर्तव्यावर नसल्याने महापालिका एक दिवस आयुक्तांविना राहणार आहे.
महापालिका आयुक्त व प्रशासक इक्बालसिंह हे सुट्टीवर असून ते सोमवारी सेवेत रुजू होत आहेत. या काळात त्यांनी प्रभारी आयुक्तपदाची सुत्रे अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे यांच्याकडे सोपवली होती. परंतु आश्विनी भिडे आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे आदींसह अधिकारी वर्ग हे स्टुडगार्डला भगिनी शहर अंतर्गत कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी शनिवारी २३ सप्टेंबर २०२३ जर्मनीला रवाना झाले आहे. मात्र, रविवार असल्याने याचा प्रभारी भार अन्य कुणाकडे सोपवण्यात आला नाही.
(हेही वाचा-IND vs AUS : ऑस्ट्रेलियासाठी ‘करो या मरो’ तर भारताला मालिका विजयाची संधी)
अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू हे शनिवारी व रविवारी या दोन दिवशी सुट्टीवर आहेत तर नव्याने अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्त झालेल्या डॉ. अश्विनी जोशी या रविवारपर्यंत सुट्टीवर आहेत. त्यामुळे दोन अतिरिक्त आयुक्त जर्मनीला महापालिकेचे (BMC) प्रतिनिधी म्हणून गेले असून आयुक्तांसह दोन अतिरिक्त आयुक्त हे रविवारपर्यंत सुट्टीवर असल्याने रविवारी महापालिका ही आयुक्तांविना राहणार आहे. रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने तसा कोणताही फरक पडणार नसला तरी या दिवशी कोणत्याही प्रकारची आपत्कालिन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने आदेश देण्यात अनेक अडचणी येवू शकतात.
रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने आयुक्तपदाचा प्रभारी भार अन्य कुठल्या अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आला नसावा अशी शक्यता काही निवृत्त अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे आणि अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे हे पुढील आठवड्यांच्या काळात नसल्याने त्याच्याकडील पदांचा अतिरिक्त कार्यभार अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू (प्रकल्प)यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. डॉ अश्विनी जोशी यांनी पदभार स्वीकारुन दोनच दिवस झाल्याने त्यांच्याकडे याचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्याऐवजी अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) यांच्याकडे सोपवण्यात आल्याचे सांगितले जाते.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community