मुंबईसह राज्यामधील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनच्या पुरवठ्याचा तुटवडा निर्माण असल्याची तक्रारी येत असतानाच मुंबईतील बोरीवली भगवती आणि गोवंडीतील पंडित मदनमोहन मालवीय रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन साठा संपल्याने रुग्णांना चक्क कोविड सेंटरमध्ये हलवण्यात आले आहे. परंतु मुंबई महापालिकेच्या १६ उपनगरीय रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लांट बसवण्याचा प्रस्तावाच्या फाईलवर आरोग्य विभागाचे अधिकारी बसून आहेत. मागील वर्षभरापासून सर्व उपनगरीय रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लांट बसवण्याची मागणी होत आहे. परंतु याकडे दुर्लक्ष करणाऱ्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे दोन उपनगरीय रुग्णालयांमधील रुग्णांना ऑक्सिजन अभावी अन्य कोविड केंद्रात हलवण्याची नामुष्की महापालिकेवर आली आहे. या घटनेमुळे कोट्यवधी रुपयांचा अर्थसंकल्प असलेल्या महापालिकेची सर्वच स्तरावर बदनामी होत आहे.
ऑक्सिजन तुडवड्यामुळे रुग्णांना हलवले!
मुंबईत कोरेाना बाधित रुग्णांचा आकडा झपाट्याने असल्याने महापालिकेसह खासगी रुग्णालयांच्या आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येत आहे. सध्या सरासरी नऊ हजार दैनंदिन रुग्ण आढळून येत असले तरी त्यातील सुमारे २० टक्के रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करावे लागते. उर्वरीत सर्व रुग्ण हे घरीच राहून उपचार घेत आहेत. मात्र, मागील दोन-चार दिवसांपासून ऑक्सिजन बेडचा तुडवडा जाणू लागला आहे. त्यातच शुक्रवारी बोरीवली भगवती आणि गोवंडीतील पंडित मदन मोहन मालवीय रुग्णालयातील ऑक्सिजनचा साठा संपल्याने कोविड रुग्णांना अनु्क्रमे दहिसर व मुलुंड येथील कोविड सेंटरमध्ये हलवण्यात आले आहे.
(हेही वाचा : कोरोनाचा कहर : लाट लवकर ओसरली नाही, तर कब्रस्तानातही जागा अपुरी पडेल! )
आयुक्तांच्या मंजुरीनंतरही १६ उपनगरीय रुग्णालयांमधील प्लांट कागदावरच
मुंबई महापालिकेच्या विशेष रुग्णालयांपैकी कस्तुरबा रुग्णालय आणि जोगेश्वरी ट्रामा केअर रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट बसवण्यात आले आहेत. याच धर्तीवर उर्वरीत १६ उपनगरीय रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लांट बसवण्याचा निर्णय मागील वर्षांपासून प्रलंबित आहे. आयुक्तांनी हे प्लांट बसवण्यास मंजुरीही दिलेली आहे. मात्र, या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लांट करायला महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांकडूनच दुर्लक्ष केला जात असून त्यांच्या निष्काळजीपणामुळेच आज या सर्व रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लांट उभारला गेलेला नाही,अशीी माहिती समोर आली आहे.
कायमस्वरुपी ऑक्सिजन प्लांट उभारण्याची इच्छा नाही!
या एका ऑक्सिजन प्लांटच्या उभारणीसाठी सुमारे ७० लाख रुपयांचा खर्च येत आहे. त्यामुळे सुमारे ३९ हजार कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या मुंबई महापालिकेला सुमारे १२ कोटींचा खर्च करणे कठिण जाते का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सध्या वांद्रे भाभा, कुर्ला भाभा, व्ही.एन.देसाई रुग्णालय, गोरेगाव सिध्दार्थ रुग्णालय, एस.के. पाटील रुग्णालय, मालाड एम.व्ही.देसाई रुग्णालय, बोरीवली भगवती रुग्णालय, बोरीवली कस्तुरबा रुग्णालय, कांदिवली डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, चेंबूर माँ रुग्णालय, घाटकोपर राजावाडी रुग्णालय, घाटकोपर संत मुक्ताबाई रुगाालय, विक्रोळी महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालय, मुलुंड एम.टी. अगरवाल, मुलुंड स्वातंत्र्यवीर सावरकर रुग्णालय आदी उपनगरीय १६ महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये कोविडच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन प्लांट उभारला जावा, असा प्रस्ताव तयार करण्यात आला हेाता. कोविड केंद्रांमध्ये ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आले आहे. त्यातुलनेत या उपनगरीय रुग्णालयांमध्ये अशाप्रकारचे प्लांट उभारले गेल्यास ते कायमस्वरुपी होती आणि ऑक्सिजन बाटला सांभाळण्याची दगदग निघून जाईल. विशेष म्हणजे या बाटलाच्या वार्षिक खर्चाच्या तुलनेत ६ कोटी रुपयांची मोठी बचत होणाार आहे. हा प्लांट बनवल्यास त्यावर वर्षाला १ कोटी रुपयांचा खर्च येतो. पण महापालिकेच्या आरोग्य विभागाला कायमस्वरुपी ऑक्सिजन प्लांट उभारण्याची इच्छा नाही. त्या निष्क्रीयेमुळे शुक्रवारी याप्रकारच्या उपनगरीय रुग्णालयांमधून ऑक्सिजनचा साठा संपल्याने रुग्णांना अन्यश्र हलवावे लागले.
महापौर आणि आरोग्य समिती अध्यक्ष यांनी दिले आदेश!
मुंबईतील महापालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणू लागल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर आणि आरोग्य समिती अध्यक्षा राजुल पटेल यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी वांद्रे भाभा, कुर्ला भाभा,बोरीवली भगवती आणि गोवंडी पंडित मदन मोहन मालवीय रुग्णालयांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी हँडी ऑक्सिजनचा वापर करण्याचे निर्देश महापौर आणि आरोग्य समिती अध्यक्षांनी दिले. तसेच कायम स्वरुपी तोडगा काढण्यासाठी लिक्वीड स्वरुपातील ऑक्सिजन प्लांट बसवण्याचेही निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
सर्व साधारण वॉर्डातील एक रुग्णाला लागणारा ऑक्सिजन : २० लिटर प्रत्येक मिनिट
आयसीयूमध्ये दाखल केलेल्या रुग्णाला लागणारे ऑक्सिजन : ६० लिटर प्रत्येक मिनिट
एका सिलेंडरची किंमत : ३७० रुपये
एका सिलेंडरमधील ऑक्सिजनचेप्रमाण : ७ हजार क्युबिक
Join Our WhatsApp Community