निवडणूक कामांसाठी कर्मचारी पाठवण्यास महापालिकेचा नकार! 

साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यामधील तरतुदींच्या अनुषंगाने कोरोना उपाययोजना करण्याच्या दृष्ट्कोनातून पुरेसा कर्मचारी वर्ग असणे आवश्यक आहे, असे कारण आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. 

मुंबईमध्ये विधानसभा मतदार संघाच्या मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम हाती घेण्यात येत असून यासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची मदत घेण्यासाठी त्यांच्या नावाच्या ऑर्डर काढल्या जात आहेत. याची दखल घेत महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून विविध विधानसभा मतदार संघामधील मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी महापालिकेमधील अधिकारी तथा कर्मचारी वर्ग यांना मतदान केंद्र स्तरीय अधिकारी अर्थात बीएलओ म्हणून उपलब्ध करून देणे शक्य होणार नसल्याचे म्हटले आहे. सद्यस्थितीत कोविड-१९च्या कर्तव्यासह पावसाळी कामकाजासाठी विभाग कार्यालयांमधील कर्मचारी वर्ग अपुरा असून विभाग कार्यालयांतील अत्यावश्यक कामांसह अन्य दैनंदिन कामे सुरु असल्याने या कामगार, कर्मचाऱ्यांची कार्यालयात उपस्थिती असणे आवश्यक असल्याचेही आयुक्तांनी म्हटले आहे.

कर्मचाऱ्यांच्या नावे परस्पर आदेश प्राप्त होत आहेत!

भारत निवडणूक आयोग व राज्याचे मुख्य निवडणूक आयोग यांच्या आदेशाने मतदार यादी शुध्दीकरणाच्या अनुषंगाने १ जानेवारी २०२१च्या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादीची विशेष संशिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबवण्यात आला आहे. त्या अनुषंगाने महापालिकेचे कर्मचारी उपलब्ध करून देता येणार नाही, याबाबत १३ नोव्हेंबर २०२० रोजी कळवण्यात आले होते. असेही असूनही मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून महापालिकेतील विविध खाते तथा विभाग कार्यालयांतील कर्मचाऱ्यांच्या नावे परस्पर आदेश प्राप्त होत आहेत. त्यामुळे आयुक्तांनी जिल्हाधिकारी यांना पत्र लिहून मुंबईसह जगभरात कोविड-१९ विषाणू रोगाचा प्रभाव कमी होत असला तरी महापालिकेचे काही अधिकारी, कर्मचारी हे कोविडच्या उपाययोजनेसाठी सहभागी असून कर्तव्य बजावत आहेत. तसेच भविष्यात तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांच्या माध्यमातून वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यामधील तरतुदींच्या अनुषंगाने कोरोना उपाययोजना करण्याच्या दृष्ट्कोनातून पुरेसा कर्मचारी वर्ग असणे आवश्यक आहे, असे आयुक्तांनी म्हटले आहे.

(हेही वाचा : होय! तेजस ठाकरे राजकारणात येतोय!)

महापालिका निवडणुकीचीही कामे सुरु आहेत!

सन २०२१ वर्षांत अनेक अधिकारी, कर्मचारी हे नियत वयोमानानुसार निवृत्त झाले आहेत, तर काहींनी स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे. कोविडमुळे विविध रिक्त पदांकरता भरती न झाल्याने बरीच पदे रिक्त आहेत. शासकीय कार्यालयात १५ ते ५० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती शिथिल केलेली असताना महापालिका कर्मचाऱ्यांची उपस्थिती १०० टक्के एवढी होती. तरीही या कामांसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची कमतरता भासत होती. मुंबई महापालिकेची आगामी सार्वत्रिक निवडणूक २०२२ सुरळीत पार पाडण्यासाठी टप्प्याटप्प्याने कामाचे नियोजन करण्याच्या दृष्टिकोनातून विविध पदांवर कर्मचाऱ्यांची सेवा निश्चित करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. या निवडणूक कामकाजासाठी महापालिका कर्मचारी व अधिकारी यांची आवश्यकता असल्याचे आयुक्तांनी नमूद केले आहे. 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here