विरोधी पक्षनेत्यांनाच अभियंत्यांनी दाखवले ‘पाणी’

आपल्या प्रभागात मागील १५ दिवसांपासून पाण्याची तीव्र समस्या आहे, असे रवी राजा म्हणाले.

132

मुंबईत आजवर नगरसेवकांच्या विभागातील पाणी पळवणाऱ्या अभियंत्यांनी आता चक्क विरोधी पक्षनेते रवी राजा यांनाच पाणी दाखवले आहे. कुर्ल्यातील दोन नगरसेवकांचा जीव पाण्याच्या नावाखाली अधिकाऱ्यांनी मेटाकुटीस आणलेला आहे. त्यातच आता विरोधी पक्षनेते रवी राजा यांची भेट पडली आहे. एफ/उत्तर विभागातील अभियंत्यांनी राजा यांच्या विरोधात अशी काही चावी मारली की, त्यांना सभागृहात हतबल होत व्यथा मांडावी लागली. त्यामुळे प्रशासन जर विभागातील जनतेला पाण्यापासून वंचित ठेवणार असेल, तर आपण याविरोधात पोलिस ठाण्यात जावू, असा इशाराच राजा यांनी दिला. याला सर्वच सदस्यांनी पाठिंबा दिल्याने अखेर प्रशासनाचा निषेध व्यक्त करत स्थायी समितीचे कामकाजच तहकूब करण्यात आले आहे.

…तर गुन्हा दाखल करू!

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत स्काडा प्रणालीच्या कंत्राट कामाला मुदतवाढ देण्याच्या प्रस्तावावर बोलतांना विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी स्थायी समितीच्या सभेला जलअभियंता तसेच उपजल अभियंता हे प्रत्यक्ष उपस्थित नसून कार्यकारी अभियंता पदाचे अधिकारी पदाचे अधिकारी याठिकाणी हजर आहेत. हा एकप्रकारे यापूर्वी स्थायी समिती अध्यक्षांनी दिलेल्या आदेशाचा अवमान आहे. असे सांगतानाच आपल्या प्रभागात मागील १५ दिवसांपासून पाण्याची तीव्र समस्या आहे. ही समस्या कृत्रिम असून एका चावीवाल्या कामगाराची बदली मलबारहिलमध्ये झाल्यानंतर आपण पुन्हा त्याला याच विभागात बोलावून घेतले. पण हे जेव्हा तेथील दुय्यम अभियंत्याला समजले तेव्हा त्यांनी तेथील अभियंत्यांच्या स्वाक्षरीने निवेदन देत या कामगाराला या विभागात घेवू नये अन्यथा आम्ही काम करणार नाही, असा इशारा दिला. पण यानंतरच आपल्या विभागात कमी दाबाने पाणी येवू लागले आहे. एका कामगाराच्या बाजुने मी उभा राहिल्याने माझ्या विभागातील पाणी कमी येत आहे. हे सर्व जाणून बुजून चालले आहे. अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी.वेलरासू यांना सांगूनही पाणी समस्या सुटलेली नाही. त्यामुळे जर लोकांना पाण्याच्या मुलभूत हक्कापासून वंचित ठेवले जाणार असेल तर आपण याविरोधात अधिकाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल करू असा इशारा दिला. याला भाजपच्या ज्योती अळवणी यांनी पाठिंबा देत आपल्या विभागातही अशाचप्रकारे समस्या असल्याचे सांगितले. कोविड नंतर पहिली दिवाळी मोकळेपणाने आपण साजरी करत आहोत. पण आपण जनतेला पाणी देवू शकत नाही, तर मग याविरोधात गुन्हा दाखल व्हायलाच हवा,असे सांगितले.

(हेही वाचा : कस्तुरबा रुग्णालयात आता नवीन सुसज्ज लॅब)

अधिकाऱ्यांची चौकशी व्हायला हवी

प्रशासन जर अशाप्रकारे काम करत असेल, तर लोकप्रतिनिधींनी कशाप्रकारे काम करावे, असा सवाल करत भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी लोकप्रतिनिधींनी कशाप्रकारे काम करावे याची मार्गदर्शक तत्वे बनवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे जलअभियंता विभागात तीन वर्षांपेक्षा अधिक सेवा बजावणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी शिंदे यांनी केली. प्रशासनाच्या या कृत्याला स्थायी समितीच जबाबदार असल्याचे सांगत समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) यांना जलअभियंता विभागाकडे लक्ष द्यायला वेळ आहे का, असा सवाल केला.

लोकप्रतिधींचीच मुस्कटदाबी

कुर्ल्यातील नगरसेवक हरिष भांदिर्गे यांनी आंधळं दळतंय कुत्रं पिठ खातंय, अशी जलअभियंता विभागाची अवस्था असून कुर्ला विभागात रमजान ईदपासून पाण्याची तीव्र समस्या निर्माण झाली आहे. पाणी मागितले तर आमच्याविरोधात एफआयआर दाखल केला जातो. दुसरे नगरसेवक किरण लांडगे हेही पाण्याच्या मुद्दयावरून आवाज उठवल्याने त्यांना जामीन नाकारल्याने ते वणवण फिरत आहे. परंतु तुम्ही कितीही एफआयआर दाखल करा, आम्ही जराही घाबरणार नाही. यांच्याकडे एफआयआर दाखल करायला वेळ आहे, पण पाणी द्यायला वेळ नाही, असे सांगत तीव्र नाराजी व्यक्त केली. तर आर मध्य व आर उत्तर विभागाच्या प्रभाग समिती अध्यक्षा सुजाता पाटेकर यांनीही बोरीवली व दहिसरमध्ये एकप्रकारे अघोषित पाणी कपात असल्याचे सांगितले. पाण्याचा दाब नियंत्रित करण्यासाठी वेळ कमी केला जातो, असेही त्यांनी सांगितले. यावेळी झालेल्या बैठकीत  राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव, राजेश्री शिरवडकर, संध्या दोशी, विजेंद्र शिंदे, राजुल पटेल, आसिफ झकेरिया, जावेद जुनेजा आणि भालचंद्र शिरसाट आदींनी भाग घेतला. यावेळी प्रशासनाच्यावतीने डॉ. संजीवकुमार यांनी संबंधित विभागाला सूचना दिल्या जातील, असे आश्वासन दिले. त्यामुळे अखेर राजा यांनी समितीचा अवमान केल्यामुळे झटपट सभा तहकूबी मांडली. याला सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी पाठिंबा दिल्यानंतर एकमताने सूचना मान्य करत अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सभेचे कामकाज तहकूब केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.