मुंबईतील सरसकट सर्व शाळा ऑफलाईन!

93

मुंबईतील सर्व शाळा सुरु करण्यात आल्यानंतरही काही शाळांमध्ये प्रत्यक्ष तर काही शाळांमध्ये ऑनलाईन वर्ग भरले जात आहेत. परंतु आता कोविडची लाट ओसरली गेल्याने तसेच निर्बंध शिथिल झाल्याने आता सर्व शाळांमध्ये यापुढे व्हिडीओ काँफरन्सीद्वारे ऑनलाईन वर्ग भरले जाणार नाहीत. त्यामुळे सर्व शाळांना आता प्रत्यक्ष उपस्थितीच शाळा आणि शालेय परीक्षा घ्याव्या लागणार असून याबाबत महापालिका शिक्षण विभागाने परिपत्रकच जारी केले आहे.

( हेही वाचा : आर्ट फेस्टिव्हलमुळे वनिता समाज कल्याण केंद्राचे ‘शुद्धीकरण’! )

शाळा पूर्वीप्रमाणे प्रत्यक्ष उपस्थितीत

कोविडचा प्रार्दुभाव मोठ्याप्रमाणात झाल्याने शाळा बंद करण्यात आल्या होत्या. परंतु आता कोविडच्या रुग्णांची संख्या घटल्याने तसेच निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर मुंबईतील काही शाळा सुरु करण्यात आल्या, तर काही शाळांनी प्रत्यक्ष उपस्थितीमध्ये शाळा भरवण्याऐवजी ऑनलाईन शाळा सुरु करण्यावरच भर दिला आहे. यासर्व पार्श्वभूमीवर उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्यासोबत चर्चा केली. या वेळी अतिरिक्त अश्विनी भिडे, कोविड टास्क फोर्सचे डॉ. शशांक यांच्यासह सहआयुक्त (शिक्षण) अजित कुंभार तसेच शिक्षणाधिकारी आदी उपस्थित होते. या बैठकीमध्ये सर्व शाळा पूर्वीप्रमाणे सुरळीत प्रत्यक्ष उपस्थितीमध्ये सुरु करण्याबाबतचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये प्रत्यक्ष उपस्थितीत शाळा सुरु करण्याबाबत कोणतीही हरकत नाही यावर एकमत झाले.

परिपत्रक जारी 

याबाबत महापालिका शिक्षण विभागाने २२ फेब्रुवारी रोजी परिपत्रक जारी करून बृहन्मुंबई क्षेत्रातील व नगरबाह्य सर्व माध्यमाच्या सर्व बोर्डाच्या खासगी, अनुदानित व विना अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळा पूर्ण वेळ व पूर्ण क्षमतेचे सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. यामध्ये विद्यार्थी शाळेत प्रवेश करताना त्यांची तापमान तपासणी करण्यात यावी असे निर्देश दिले आहे. तसेच मधल्या सुट्टीमध्ये पूर्वीप्रमाणे आहार घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. पालकांच्या संमतीने मुलांचे १०० टक्के लसीकरण केले जावे अशा सूचनाही केल्या आहेत. जर विद्यार्थ्याला कोविड सदृश्य लक्षणे आढळल्यास पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवू नये, असे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांच्या स्वाक्षरीने परिपत्रक सर्व माध्यमांच्या सर्व शाळांना जारी करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.