शिक्षण व आरोग्य हे किती महत्त्वाचे आहे, हे आपल्याला लॉकडाउनच्या काळात चांगलेच कळले आहे. महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना टॅब वितरणाचा कार्यक्रम आटपून येथे आलो असून प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना टॅब देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे राज्याचे पर्यावरण व पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मालाड अप्पापाडा येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी सांगितले.
सर्व विभाग कार्यालयांमध्ये आरोग्य सुविधांनी युक्त वास्तू
महानगरपालिका पी/ उत्तर विभागातील मालाड (पूर्व) च्या आप्पापाडा येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते तसेच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी पार पडले. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते फीत कापून तसेच कोनशिलेचे अनावरण करून नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी संपूर्ण आरोग्य केंद्राची पाहणी करून सोयी-सुविधांचा आढावा घेतला. याप्रसंगी बोलतांना त्यांनी आरोग्य सुविधेसाठी नागरिकांना दोन किलोमीटरच्या वर जावे लागू नये, यादृष्टीने मुंबई महानगरपालिकेने प्रत्येक विभागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बळकटीकरण करावे, असे प्रतिपादन केले. ते म्हणाले, आज या ठिकाणी सर्व आरोग्य सुविधांनी युक्त अशी वास्त उभी राहिली आहे. याप्रमाणेच सर्व विभाग कार्यालयांमध्ये अशा सर्व आरोग्य सुविधांनी युक्त वास्तू उभ्या राहणे गरजेचे आहे.
(हेही वाचा : प्रकल्पबाधित कुटुंबाला घरांऐवजी मिळणार ५० लाखांपर्यंतची रक्कम)
लहान मुलांचे डॉक्टर येऊन बालकांची तपासणी करणार
कोरोना काळात आपल्या कामाचे जे कौतुक होत आहे, त्याबद्दल मुंबई महानगरपालिकेचा प्रत्येक कर्मचारी अभिनंदनास पात्र असून महापौर किशोरी पेडणेकर, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे व त्यांच्या टीमने चांगले काम केले असल्याचे त्यांनी सांगितले. या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सिटीस्कॅन मशिन उपलब्ध करून देण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी महापालिका अधिकाऱ्यांना दिले. कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी आपल्या प्रास्ताविकातून कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका विशद केली. त्या म्हणाल्या की, ही इमारत तळमजला अधिक सहा माळयांची असून तीन वर्षांपूर्वी ही इमारत आपल्या ताब्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. हे आरोग्य केंद्र सर्व सुविधांनी युक्त होण्यासाठी स्थानिक आमदार सुनील प्रभू यांच्यासोबत वेळोवेळी बैठका घेतल्याचे त्यांनी सांगितले. लहान मुलांसाठी याठिकाणी विशेष सुविधा असून लहान मुलांचे डॉक्टर याठिकाणी येऊन बालकांची तपासणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासोबतच गरोदर माता, स्तनदा माता यांची सुद्धा तपासणी याठिकाणी होणार आहे. त्याचप्रमाणे “आपली चिकित्सा”या कार्यक्रमांतर्गत अवघ्या पन्नास ते शंभर रुपयांमध्ये सर्व प्रकारच्या तपासणीचा लाभ नागरिकांना घेता येणार आहे. या ठिकाणी सर्व सुविधा मोफत उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. आप्पापाडा परिसरातील नागरिकांना व्यापक स्वरूपात एकाच ठिकाणी आरोग्य सुविधा पुरविणे हे या आरोग्य केंद्राचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी खासदार गजानन कीर्तीकर, आमदार सुनील प्रभू, उप महापौर अँड. सुहास वाडकर, विधी समिती अध्यक्ष हर्षद कारकर, पी/ उत्तर विभागाच्या प्रभाग समिती अध्यक्षा संगीता सुतार, स्थानिक नगरसेवक आत्माराम चाचे, नगरसेविका साधना माने, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कु-हाडे, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे उपस्थित होत्या.
Join Our WhatsApp Community