बाबुलनाथ मंदिराजवळील ‘संस्कृती हॉल’वर महापालिकेची कारवाई!

'संस्कृती हॉल'मध्ये विवाह कार्यक्रम सुरू असल्याचे व सुमारे १५० व्यक्ती विवाह सोहळ्याला उपस्थित असल्याचे आढळून आले.

दक्षिण मुंबईतील बाबुलनाथ मंदिराजवळील संस्कृती हॉलमध्ये कोविड प्रतिबंध विषयक नियमांचे उल्लंघन करून विवाह सोहळा आयोजित केल्या प्रकरणी संबंधित सभागृहावर ५० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. तसेच सभागृह लग्न सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या संबंधितांवर एफ.आय.आर. गावदेवी पोलिस ठाण्यात नोंदवण्यात येत आहे.

कोरोना नियमांचे उल्लंघन!

बाबुलनाथ मंदिराजवळील दादीसेठ मार्गालगत असणाऱ्या ‘संस्कृती हॉल’ मध्ये नियमांचे उल्लंघन करून विवाह सोहळा सुरू असल्याची माहिती महापालिकेच्या ‘डि’ विभाग कार्यालयाला प्राप्त झाली. ही माहिती मिळताच विभाग कार्यालयाच्या टिमने सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी धाड टाकली. त्यावेळी तिथे विवाह कार्यक्रम सुरू असल्याचे व सुमारे १५० व्यक्ती विवाह सोहळ्याला उपस्थित असल्याचे आढळून आले. तसेच त्या ठिकाणी उपस्थित व्यक्तींमध्ये नियमानुसार आवश्यक असणारे शारीरिक अंतर अर्थात सोशल डिस्टन्सही राखण्यात आले नव्हते.

(हेही वाचा : कोकणात राणेंनी ‘करुन दाखवले’!)

५० हजारांचा ठोठावला दंड!

महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन केल्याने या हॉलवर आणि विवाह सोहळ्याच्या आयोजकांवर तात्काळ कारवाई केली. या कारवाईमध्ये प्रामुख्याने संबंधित हॉल चालकांवर तात्काळ ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तसेच हॉल चालक व संबंधित लग्न सोहळ्याच्या आयोजकांविरोधात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गावदेवी पोलिस ठाण्यात एफ.आय.आर. दाखल करण्याची कार्यवाही सुरु असल्याची माहिती डि विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here