अग्निसुरक्षा शुल्काचा भार इमारतींमधील रहिवाशांवर येणार आहे. महानगर पालिकेने याबाबत सर्वेक्षणही सुरु केले आहे. तर, हे सर्वेक्षण पूर्ण करुन त्याचा अहवाल सादर करेपर्यंत या शुल्क वसुलीला स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी शुक्रवारी, ९ जुलै रोजी स्थगिती दिली. मात्र, या शुल्काची तरतूद महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक अधिनियमात असल्याने भविष्यात या शुल्काची वसुली ही अग्निशमन दलाच्या वतीने होणार आहे, हे निश्चित आहे.
शुल्क वसुलीबाबत २ आठवड्यांपासून आहे वाद!
मुंबईतील २०१४ पासूनच्या इमारतीकडून सेवा शुल्क वसूल करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यावर दोन आठवड्यापासून वाद सुरु आहे. सुरुवातीला हे शुल्क रहिवाशांकडून नाही तर विकासकांकडून वसूल करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र, आज भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी पॉईंट ऑफ इन्फरमेशन अंतर्गत या शुल्काबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यावर सर्व पक्षिय सदस्यांनी त्यांना साथ दिली.
(हेही वाचा : मुंबईच्या ‘या’ भागात होणार पाणीपुरवठा बंद!)
सद्यस्थितीत मुंबईकरांवर करवाढ, शुल्कवाढ नको!
विकासकांकडून सात वर्षानंतर शुल्क कसे वसूल करणार, असा प्रश्नही यावेळी उपस्थित झाला. यावर शुल्क वसुलीबाबत सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. यात विकासकांकडून किती आणि रहिवाशांकडून किती शुल्क वसूल होईल, याबाबत माहिती उपलब्ध होऊ शकेल, असे प्रशासनाने सांगितले. त्यामुळे या शुल्क वसुलीला स्थगिती देण्याची मागणी सदस्यांनी केली. ही शुल्क वसुली अधिनयमात तरतूद आहे. त्यामुळे कधी ना कधी तर ही शुल्क वसुली होणार, असे भाजपचे भालचंद्र शिरसाट यांनी नमुद केले. पण, त्याचा भार रहिवाशांवर आला नाही पाहिजे. यापूर्वी स्थायी समितीची बैठक स्थगित झाल्यास आयुक्त गटनेत्यांशी चर्चा करायचे, अडचणी समजून सांगायचे, पण आता तसे होत नाही, असेही त्यांनी सांगितले. सध्याच्या परीस्थितीत मुंबईवर कोणतीही करवाढ शुल्कवाढ होणार नाही. याची खबरदारी घेतली जाणार आहे. तुर्तास या शुल्क वसुलीला स्थगिती देण्यात आली आहे. असे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले. तसेच शुल्क वसुलीबाबत सर्व माहिती सादर करण्याचे निर्देशही दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
(हेही वाचा : मुंबईत अजूनही नागरिक रस्त्यावर थुंकतात! ७१ जणांवर कारवाई!)
Join Our WhatsApp Community