मुंबईतील ‘या’ भागात पाण्यासाठी झाली वणवण

138

मुंबईमध्ये उष्म्याचा पारा वाढलेला असतानाच आधीच भातसा धरणातील वीज केंद्रातील बिघाडामुळे काही प्रमाणात पाण्याची कपात सुरु आहे. त्यातच मंगळवारी विक्रोळी टागोर नगर भागात जलवाहिनी फुटल्याने या आसपासच्या परिसरातील पाणी पुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. त्यामुळे मंगळवारी विक्रोळीतील टागोरनगरसह आसपासच्या विभागातील लोकांची पाण्यासाठी एकच धावपळ सुरु झाली आहे. टागोर नगर हा परिसर म्हाडाच्या नियंत्रणाखाली येता, ही जलवाहिनीची दुरूस्तीची जबाबदारी म्हाडाची आहे, पण म्हाडाने दुरूस्ती न केल्याने महापालिकेला हे काम करावे लागले.

महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे फोन खणखणू लागले

मंगळवारी दुपारी टागोर नगर परिसरला पाण्याचा पुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याने त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. हे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते. त्यामुळे या टागोरनगरसह आसपासच्या इमारतींसह वस्त्यांना रात्रीपर्यंत पाण्याचा पुरवठा होऊ शकला नाही. परिणामी प्रत्येक इमारतीसह वस्त्यांमध्ये पाण्यासाठी एकच धावपळ सुरु झाली. पाण्यासाठी स्थानिक नगरसेवकांसह महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे फोन खणखणू लागले. अचानक जलवाहिनीला गळती लागल्याने दुरुस्तीचे काम घेतल्याने याची कल्पना रहिवाशांमध्ये नसल्याने पाण्याची तीव्र समस्या निर्माण झाली होती. मात्र, हे काम पूर्ण झाल्यानंतर हा पूरवठा सुरळीत केला जाईल, असे महापालिकेकडून सांगण्यात येत होते.

(हेही वाचा सरकारी अधिका-यांमुळे संक्रमण शिबिरात घुसखोरी! मंत्री आव्हाडांची कबुली)

लोकांचे प्रचंड हाल झाले

मुंबईचा पारा वाढलेला असल्याने पाण्याची  मागणीतही वाढ होत आहे. वाढत्या उष्म्यामुळे पाण्याच्या वापरातही वाढ होत आहे. त्यामुळे अचानक पाणी पुरवठा खंडित झाल्याने रहिवाशांमध्ये तीव्र संताप पसरलेला आहे. त्यामुळे लोकांनी मिनरल वॉटरच्या बॉटल्स मिळवण्यासाठी दुकानांमध्ये धाव घेतल्याचे पहायला मिळत होते. दरम्यान, भातसा धरणातील वीज केंद्रात बिघाड झाल्याने मुंबईत सध्या १५ टक्के कपात केलेली आहे. या दुरुस्तीचे काम अजूनही लांबणीवर पडलेले असून तुर्तास अन्य ठिकाणांहून पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. त्यामुळे काही प्रमाणात पाणी मिळत असले तरी कपात कायमच आहे. त्यामुळे आधीच कमी पाणी येत असताना  विक्रोळीत अचानक पाणी पुरवठा खंडित झाल्याने लोकांचे प्रचंड हाल झाले होते. तर शहर भागातील काही भागांमध्ये आधीच सोमवार व मंगळवारी पाणीकपात जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे शहर भागात पाणीकपात जाहीर केलेली असल्याने रहिवाशी सतर्क होते. त्यामुळे पाणीकपातीची झळ त्यांना तेवढीशी बसली नव्हती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.