मुंबईतील वाढती रुग्ण संख्या आणि आयसीयू व व्हेंटिलेटर्सची वाढती मागणी लक्षात घेता महापालिकेच्यावतीने आता २०० व्हेंटिलेटर्सची खरेदी केली जात आहे. त्यातील १०० व्हेंटिलेटर्सच्या खरेदीच्या निविदाची प्रक्रिया पूर्ण झाली असून स्थायी समितीच्या मंजुरीनंतर येत्या काही दिवसांमध्येच हे व्हेंटिलेटर्स कोविड रुग्णालय आणि कोविड सेंटर्सना प्राप्त होणार आहेत.
चीनी उत्पादक कंपनीचे व्हेंटिलेटर्स खरेदी केले जाणार!
मुंबईत मागील मार्च महिन्यापासून कोविडच्या संसर्गाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या झपट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे यातील काही रुग्ण हे लक्षणे नसल्याने घरीच उपचार घेत असले तरी कालांतराने यातील काही रुग्णांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना खासगी तसेच महापालिकेच्या कोविड रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. या सर्वांना आता आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटर्सचीच अधिक मागणी होत आहे. त्यामुळे आयसीयू बेडच्या वाढत्या मागणीचा विचार करता महापालिकेने २०० व्हेंटिलेटर्स खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यातील पहिल्या १०० व्हेंटिलेटर्सच्या खरेदीकरता निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे. यामध्ये सन इलेक्ट्रो मेडिकल डिव्हाईसेसस ही कंपनी पात्र ठरली आहे. या कंपनीच्या माध्यमातून शेंनझेंन मिटू बायो मेडिकल या चीनी उत्पादक कंपनीचे व्हेंटिलेटर्स खरेदी केले जाणार आहे. या १०० व्हेंटिलेटर्सच्या खरेदीत पहिली तीन वर्षे हमी कालावधी आणि पुढील पाच वर्षांची देखभाल याकरता एकूण १६.७७ कोटी रुपये खर्च केला जाणार आहे.
(हेही वाचा : कोरोना संकटात एनएसएस, एनसीसीसह विद्यार्थी संघटनांचे सहकार्य घ्या! राज्यपालांचे आवाहन )
३३ निओ नेटल व्हेंटिलेटर्सचा निविदेचा विसर!
एका बाजुला कोविड रुग्णांची काळजी घेणाऱ्या महापालिकेने अवघ्या १५ दिवसांमध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण करत १०० अॅडल्ट व्हेंटिलेटर्सची खरेदी करत असली तरी दुसरीकडे २०१९मध्ये ३३ छोट्या बच्चूसह मोठ्यांच्या उपयोगात येणारे निओनेटल व्हेंटिलेटर्सची निविदा प्रक्रिया पूर्ण करूनही खरेदी केलेली नाही. त्यामुळे आज कोविडचा संसर्ग लहान मुलांमध्येही होत असताना या व्हेंटिलेटर्सची आवश्यकताही तेवढीच आहे. प्रशासन जे सहज करता येणे शक्य आहे, ते पूर्ण न करता कोविडच्या नावाखाली खरेदी करत सुटले आहे. त्यामुळे ज्या ३३ निओनेटल व्हेंटिलेटर्सची गरज आज प्रशासनाला नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Join Our WhatsApp Community