महापालिका मलबार हिलकडील झाडांचे आरोग्य तपासणार!

मलबार हिलचा पट्टा उंचावर असल्याने तेथील झाडांना अधिक धोका असतो. त्यामुळे येथील झाडांचा सर्वे करण्यासाठी वृक्षतज्ज्ञ असलेले आर्बोरिस्ट वैभव राजे यांची सल्लागार म्हणून नेमणूक केली आहे.

पावसाळ्यात वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे बऱ्याच वेळा मजबूत दिसणारी झाडेही मुळासकट उन्मळून पडतात. हवेच्या झोताबरोबर ही झाडे बऱ्याच वेळा उन्मळून पडतात. त्यामुळे प्रत्येक झाडाचे आरोग्य तपासणे ही काळाची गरज असून यासाठी झाडांच्या तज्ज्ञ डॉक्टरांची गरज असते. म्हणून मुंबईतील झाडांचे आरोग्य तपासून त्याप्रमाणे सर्वे केला जाणार आहे. मुंबईतील डि विभागातील मलबार हिल पट्ट्यातील झाडांचा सर्वे करून कोणती झाडे सक्षमपणे मुळासकट उभी आहेत किंवा कुठल्या झाडांची मुळे कमजोर आहेत, काही झाडे आतून पोखरली गेली आहेत का, याचा अहवाल तयार करण्यासाठी आर्बोरिस्टची सल्लागार म्हणून नेमणूक केली आहे.

वृक्षतज्ज्ञ म्हणून आर्बोरिस्ट वैभव राजे यांची सल्लागार म्हणून नेमणूक

मुंबईत पावसाळ्यापूर्वी अनेकदा झाडांच्या फांद्यांची छाटणी केल्यानंतरही अनेक झाडे उन्मळून पडण्याचे प्रकार घडत आहेत. मागील चार ते पाच वर्षांमधील पावसाळ्यात पडणाऱ्या झाडांची संख्या विलक्षण आहे. त्यातच नुकत्याच येवून गेलेल्या तोक्ते चक्रीवादळातही सुमारे सव्वा दोन ते अडीच हजार झाडांची पडझड झाली. यामध्ये मलबार हिल, ग्रॅट रोड, मुंबई सेंट्रल या डि विभागात चक्रीवादळच्या दोन दिवसांमध्ये १३२ झाडांची पडझड झाली होती. विशेष मलबार हिलचा पट्टा उंचावर असल्याने तेथील झाडांना अधिक धोका असतो. त्यामुळे या मलबार हिलमधील झाडांचा सर्वे करून कमकुवत झाडांचा अहवाल बनवण्यासाठी वृक्षतज्ज्ञ असलेले आर्बोरिस्ट वैभव राजे यांची महापालिकेच्या उद्यान विभागाच्यावतीने सल्लागार म्हणून नेमणूक केली आहे. या सल्लागाराच्या अहवालानुसार महापालिकेच्या उद्यान विभागाच्यावतीने पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

(हेही वाचा : ठाकरे सरकारवर टीका, केंद्राच्या निर्णयावर मात्र भाजप नेते गप्प!)

मलबार हिल प्रायोगिक तत्वावर निवडला!

याबाबत महापालिकेच्या डि विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता डि विभागातील काही झाडांचा सर्वे करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर आर्बोरिस्ट वैभव राजे यांची नियुक्ती उद्यान विभागाच्यावतीने केली जात आहे. या आर्बोरिस्टच्या मदतीने मलबार हिलमधील झाडांचा सर्वे केला जाणार आहे. यामध्ये चांगली दिसणारी परंतु आतून कमजोर होत जाणारी तथा कमकुवत असणाऱ्या झाडांचा अहवाल तयार केला जाणार आहे. मलबार हिलमध्ये हवेचा झोत अधिक असतो. त्यामुळे प्रायोगिक तत्वावर हा भाग निवडण्यात आला आहे. जर अहवालानंतर योग्यप्रकारे निष्कर्ष असल्याचे आढळून आल्यास पुढील सर्वेबाबत विचार केला जाईल, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here