मुंबईतील उद्यानात बाळांना स्तनपान करण्यासाठी स्वतंत्र जागेची व्यवस्था करण्याची मागणी नगरसेवकांकडून होत असतानाच मुंबईत प्रथमच बेबी फिडींगची व्यवस्था असलेल्या बेबी उद्यानाची निर्मिती महापालिकेच्यावतीने केली जात आहे. आग्रीपाड्यात प्रथमच अशा प्रकारच्या सुविधेसह हे उद्याने बनवले जात आहे.
असे होणार बेबी उद्यान
भायखळा ई विभागातील आग्रीपाडा भागातील एका उद्यानासाठी आरक्षित असलेल्या मोठ्या भुखंडावर महापालिका उद्यान कक्षाच्या माध्यमातून बेबी उद्यान विकसित करण्यात येत आहे. या उद्यानाच्या बाळांना स्तनपानासाठीची अर्थात बेबी फिडींगची खोली बांधली जाणार आहे. तसेच स्वच्छता गृह, मुलांसाठी खेळाच्या जागेची निर्मिती, खुल्या व्यायाम शाळेची निर्मिती करणे, सामुदायिक जागा बनवणे, योगासनासाठी जागा बनवणे, सजावटीचे दिवे बसवण्यात येणार आहे. शिवाय सुशोभित प्रवेशद्वार बनवणे, संरक्षण भिंतीची दुरुस्ती करणे, संपूर्ण संरक्षण भिंतीला नवीन सजावटीच्या जाळ्या बसवण्यात येणार आहे. याठिकाणी उग्र कोटा आणि जैसलमेर लादी वापरुन नवीन पदपथ बनवण्यात येणार आहे. तसेच लॉन, झुडुपे आणि हिरवळीची कामे याठिकाणी करण्यात येणार आहेत.
(हेही वाचा : आता चालता-चालता न्याहाळता येणार महालक्ष्मी रेसकोर्स!)
१ कोटी ७८ लाख रुपये खर्च करण्यात येणार
या कामांसाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. यासाठी १ कोटी ७८ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. भूमी कार्पोरेशन ही कंपनी यासाठी पात्र ठरली असून या कंपनीने महापालिकेच्या अंदाजित रकमेपेक्षा ३६ टक्के कमी दराने बोली लावली आहे. एका बाजुला महापालिकेने अंदाजित केलेल्या दरापेक्षा उद्यानांच्या देखभाल कंत्राटात ३० टक्के पेक्षा कमी बोली लावल्यामुळे महापालिकेने या निविदा रद्द करून त्यांची इसारा रक्कम जप्त केली होती. परंतु या उद्यानाच्या विकासात कंत्राटदाराने सुमारे ३७ टक्के कमी दराने बोली लावून काम मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे उद्यानाच्या देखभाली कंत्राटाच्या निविदेत जी भूमिका उद्यान विभागाने घेतली, ती भूमिका याठिकाणी न घेतल्याने उद्यान विभागाच्या कार्यपध्दतीवर शंका उपस्थित होत आहे.
Join Our WhatsApp Community