महापालिकेची २ लाख रेमडीसीवीर खरेदीची ऑर्डर!

मार्चच्या शेवटच्या आठवड्यात जिथे एक इंजेक्शन ५५० रुपयांमध्ये खरेदी केले होते, तिथे त्याच कंपनीकडून तेच इंजेक्शन जीएसटीसह सुमारे १,६०० रुपयांमध्ये खरेदी केल्याची माहिती मिळत आहे.

कोविड – १९ अर्थात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी मदतकारक ठरणा-या रेमडीसीवीर या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण होत असतानाच आपल्या कोविड सेंटर व रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची गैरसोय होवू नये, म्हणून महापालिकेने २ लाख इंजेक्शनची ऑर्डर दिली आहे. महापालिकेच्या कोविड केंद्र आणि रुग्णालयांमध्ये रुग्णांना हे इंजेक्शन मोफत उपलब्ध करून दिले जात असून या तुटवड्याचा फायदा उठवून कंपन्यांनी याचा दर दुप्पट ते अडीच पट केला आहे. त्यामुळे महापालिकेला हे इंजेक्शन चढ्या दराने खरेदी करावे लागले आहे. आता २ लाख इंजेक्शनची मागणी नोंदवण्यात आली असून प्रत्येक वेळी आवश्यकतेनुसार त्यांच्याकडून खरेदी केली जाणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

काळ्या बाजारातही इंजेक्शन उपलब्ध नाही!

मुंबईत फेब्रुवारी महिन्यापासून कोविड बाधित रुग्णांची संख्या वाढत असून बहुतांशी रुग्ण हे खासगी रुग्णालयांमध्ये दाखल होत आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयात दाखल रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेल्या रेमडेसीवीर इंजेक्शन आणून देण्याची मागणी रुग्णाच्या नातेवाईकांकडे केली जात आहे. परंतु या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णाच्या नातेवाईकांची धावपळ सुरु आहे. या इंजेक्शनसाठी कितीही रुपये मोजायला नातेवाईक तयार आहेत. परंतु काळ्या बाजारातही ते उपलब्ध होत नाही. मात्र, महापालिकेच्या कोविड केअर सेंटर व रुग्णालयांमध्ये हे इंजेक्शन मोफत उपलब्ध करून दिले जात आहे. सध्या एका दिवसाला महापालिकेला सरासरी अडीच ते तीन हजार रेमडीसीवरचे इंजेक्शन लागते.

(हेही वाचा : रेल्वे स्थानकावरील गर्दीचा जुना व्हिडिओ व्हायरल! रेल्वेने केली तक्रार!)

इंजेक्शन तुटवड्याचा फटका महापालिकेलाही बसला!

त्यामुळे महापालिकेने वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता २ लाख इंजेक्शन खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून याची मागणीही कंपनीकडे नोंदवून ठेवली आहे. मात्र, सध्या या इंजेक्शनच्या असलेल्या तुटवड्याचा फटका महापालिकेलाही बसला असल्याची माहिती मिळत आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात जिथे एक इंजेक्शन ५५० रुपयांमध्ये खरेदी केले होते, तिथे त्याच कंपनीकडून तेच इंजेक्शन जीएसटीसह सुमारे १,६०० रुपयांमध्ये खरेदी केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे कंपन्यांनी अचानकपणे भाव वाढवल्याने याचा फटका महापालिकेलाही बसला असल्याचे समजते.

 चढ्या दराने खरेदी करावे लागणार इंजेक्शन!

यासंदर्भात मध्यवर्ती खरेदी खात्याचे उपायुक्त रमांकात बिरादर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी महापालिकेच्यावतीने २ लाख इंजेक्शन खरेदी करण्यात येत असल्याचे सांगितले. महापालिकेच्या कोविड केअर सेंटर व रुग्णालयांमध्ये सरासरी सुमारे अडीच ते तीन हजार इंजेक्शनची मागणी असते. त्यामुळे भविष्यातील मागणीचा विचार करता ही खरेदी करण्यात येत आहे. यापूर्वी मागील आठवड्यात दहा हजार इंजेक्शनची खरेदी करण्यात आली होती. परंतु त्यावेळी साडेसहाशे रुपयांचा दर होता. परंतु यावेळेला कंपनीचा दर जास्त आहे, हे खरे आहे. परंतु आपण याच दरात देणार असून सरकारचे कॅपिंगही एवढेच असणार आहे. त्यामुळे त्या कॅपिंगच्या अधीन राहून हा दर असेल, असे कंपनीकडून सांगण्यात आले. तसेच सुरत, अहमदाबाद येथेही याच दराने देण्यात आल्याचे कंपनीने कळवले. त्यामुळे दोन लाख इंजेक्शनची मागणी नोंदवण्यात आली आहे. आवश्यकता असेल त्याप्रमाणे ही खरेदी केली जाईल. भविष्यात जेवढे इंजेक्शन खरेदी करू, त्यावेळी जर सरकारचे रेट कॅपिंग कमी असेल, तर त्या कमी दराने आपल्या इंजेक्शन मिळेल. विशेष म्हणजे सध्या याचा साठा एकमेव कंपनीकडे आहे. तसेच याचे उत्पादन हे २० ते २५ दिवसांनी होते. त्यामुळे याची नोंदणी करून ठेवली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here