देशभरात किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाची मोहीम सुरु असताना घाटकोपर येथील १५ वर्षांच्या मुलीचा लसीकरणानंतर मृत्यू झाल्याच्या आरोपाने मुंबई महापालिका प्रशासन चांगलेच गडबडले. ट्विटर या समाजमाध्यमावर हा आरोप करणा-या दिल्लीच्या डॉ. तरुण कोठारी या डॉक्टरवर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
आर्याला डॉ. कोठारी यांनी श्रध्दांजली वाहिली
आर्या नावाच्या पंधरा वर्षाच्या मुलीचा १२ जानेवारी रोजी मृत्यू झाला. मूळ गुजरातमधील कच्छ गावाच्या बिट्टा येथील रहिवासी असलेल्या आर्या रुपेश गोविंदचा मृत्यू लसीकरणानंतर झाल्याचा आरोप डॉ. तरुण कोठारी यांनी केला. आर्याला ट्विटरवरील आपल्या खात्यावरून डॉ. कोठारी यांनी श्रध्दांजली वाहिली. आधुनिक न्यूरोपथी आरोग्य जनजागृतीचा दाखला देत ट्रायल लसीकरणात सहभागी होऊ नका, असे आवाहन डॉ. कोठारी यांनी केले. गुरुवारी १३ जानेवारी रोजी डॉ. कोठारी यांनी टाकलेल्या पोस्टवर अनेक संमिश्र प्रतिक्रियाही उमटल्या.
नेटक-यांनी डॉ. कोठारी यांच्या पोस्टवर आलेल्या प्रतिक्रिया
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने तसेच महाराष्ट्र सायबर सेलने या चुकीच्या बातमीची नोंद घ्यावी.
– आदित्य जे
आम्ही घाटकोपरचे रहिवासी आहोत. घाटकोपरमध्ये या घटनेची नोंद नाही. संबंधित डॉक्टराची पोस्ट दिशाभूल करणारी असून, डॉक्टरवर विश्वास ठेवू नका. या डॉक्टरचे खाते तपासल्यास कोरोना एक षडयंत्र असल्याचा डॉक्टरचा दावा आहे.
– रवींद्र तिवारी
(हेही वाचा सिंधुदुर्ग किनारपट्टीवर ‘या’ संकटग्रस्त कासवानं घरटं बांधल्याची पहिल्यांदाच झालीय नोंद…)
पालिकेची कारवाई
डॉ. तरुण तिवारीची पोस्ट रिट्वीट करत संबंधित मुलीच्या छायाचित्राची विश्वासार्हता तपासा, असे आवाहन केले. तुमचा संपर्क क्रमांक मिळाल्यास या प्रकरणी बोलता येईल. ट्विटरवरील खात्यावर तुम्ही एमबीबीएस डॉक्टर असल्याचे समजले. त्यामुळे तुमच्याकडून योग्य स्पष्टीकरणाची अपेक्षा असेही पालिकेच्यावतीने सांगण्यात आले. मुलीचा फोटो चुकीच्या हेतून वापरण्यासाठी कायदेशीर कारवाईसाठी सज्ज रहा, अशी तंबीही पालिकेने डॉ. कोठारींना दिली.
आर्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने
आर्या या पंधरा वर्षाच्या मुलीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला. ही माहिती आर्याच्या पालकांनी दिली.