विनामास्क फिरणा-यांवरची कारवाई पुन्हा कडक!

मुंबईत मागील काही दिवसांपासून कोविड रुग्णांचा पारा वाढत चालला असून या मास्क न लावणा-यांविरोधात महापालिकेच्यावतीने दंडात्मक कारवाई करण्यात येते. परंतु ही कारवाई आता अधिक तीव्र करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सर्व २४ प्रशासकीय विभागांना दिले आहे. या अनुषंगाने आवश्यक तेवढ्या संख्येतील ‘क्लीन-अप मार्शल’ ची तात्पुरती नियुक्ती करण्याच्याही सूचना त्यांनी केल्या आहेत. त्याचबरोबर मुंबई पोलिसांद्वारे करण्यात येत असलेली ‘विना मास्क’ची कारवाई देखील अधिक तीव्र करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी मुंबई पोलिस दलास दिल्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत नाकाखाली आलेला मास्क तसेच मास्क न लावणाऱ्यांनी आता सावधान राहायला हवे. कारण आता क्लीन अप मार्शल आपल्या मागावर आहेत हे विसरुन नका.

महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनात मुंबईतील कोविड व आरोग्य विषयक बाबींची आढावा बैठक सोमवारी आयोजित करण्यात आली होती. दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित या बैठकीला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. संजीव कुमार, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्यासह संबंधित सह आयुक्त, उप आयुक्त, मुंबई पोलिस दलातील उप आयुक्त हे मान्यवर उपस्थित होते. त्याचबरोबर महापालिकेचे संबंधित सहाय्यक आयुक्त, संबंधित खाते प्रमुख, वरिष्ठ अधिकारी आणि महापालिकेच्या विविध रुग्णालयांचे अधिष्ठाता व संबंधित तज्ज्ञ डॉक्टर देखील या बैठकीला उपस्थित होते.

(हेही वाचा : दहीहंडीतून मनसेची हिंदुत्वाची हाक!)

 कोरोना नियमांचे कडक पालन करण्याचे निर्देश!

कोविड प्रतिबंधाच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या ३ बाबींचे परिपूर्ण पालन सर्व ठिकाणी योग्यप्रकारे होत असल्याची खातरजमा व जनजागृती नियमितपणे करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहे. यामध्ये योग्यप्रकारे मास्क परिधान करणे, सामाजिक अंतर राखणे आणि वारंवार योग्यप्रकारे साबणाने हात धुणे या बाबींचा समावेश आहे. मुंबईतील अनेक ठिकाणी योग्यप्रकारे मास्क परिधान न करता नागरिक आढळून येत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. तसेच अनेक सार्वजनिक ठिकाणी सामाजिक अंतर राखले जात नसल्याच्याही तक्रारी प्राप्त होत आहेत. याबाबत योग्य ती खबरदारी न घेतल्यास पुन्हा एकदा आपल्याला निर्बंध अधिक कडक लागू शकतात. त्यामुळे नियमांच्या उल्‍लंघनाबाबत अधिक व्यापकतेने कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here