रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर ‘या’ दिवसापासून होणार कारवाई!

116

मुंबईतील रेल्वे स्थानकांच्या परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे निर्देश पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी दिल्यानंतर पुन्हा एकदा महापालिका प्रशासन नव्या जोमाने कामाला लागली आहे. त्यामुळे रेल्वे परिसर फेरीवालामुक्त बनवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रेल्वे स्थानकांपासून १५० मीटर अंतरावर रंगाचे पट्टे मारत सीमांकन करण्याच्या सूचना अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या उपायुक्त चंदा जाधव यांनी सर्व विभागांच्या सहायक आयुक्तांना केल्या आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकापासून १५० मीटरच्या अंतरावरील सीमांकन आता प्रत्येक प्रशासकी विभागांच्यावतीने करण्यात येत असल्याने येत्या सोमवारपासून रेल्वे स्थानकाजवळील फेरीवाल्यांवरील कारवाई अधिक तीव्र होणार असल्याचे बोलले जात आहे.

कारवाई करण्याचे निर्देश

मुंबईत रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटर आणि शाळा, रुग्णालय, मंडई, धार्मिक स्थळापासून १०० मीटर परिसरात फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास बंदी घालण्यात आली आहे. न्यायालयाच्या निर्देशानंतर महापालिकेच्यावतीने प्रारंभी ही कारवाई केली जात असली, तरी पुढे या कारवाईकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे फेरीवाल्यांवरील कारवाईसंदर्भात न्यायालयाच्या निर्देशाकडे महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत होते. मात्र मागील मंगळवारी मुंबईचे महापालिका संजय पांडे यांनी पोलिस व महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन रेल्वे परिसर फेरीवालामुक्त करण्यासाठी दीडशे मीटर परिसरातील कारवाई करण्याचे निर्देश दिले. पोलिस आयुक्तांच्या निर्देशानंतर उपायुक्त (अतिक्रमण विभाग) चंदा जाधव यांनी बुधवारी सर्व विभागांच्या सहायक आयुक्तांना रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटरच्या अंतरावर रंगाचे पट्टे मारत सीमांकन करण्यात यावे असे कळवले आहे. त्यानुसार प्रत्येक विभाग कार्यालयाच्यावतीने रेल्वे स्थानकापासून प्रतिबंधित लांबी एवढ्या अंतरावर पांढऱ्या रंगाचे पट्टा मारला जात आहे. अनेक विभाग कार्यालयांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली असून काही विभाग कार्यालयाच्यावतीने ही प्रक्रिया सुरु आहे.

(हेही वाचा मुंबई-पुणे प्रवास आता अधिक वेगवान)

फेरीवाल्यांवरील कारवाईला प्रथम प्राधान्य

पोलिस आयुक्तांच्या निर्देशानंतरही शनिवारी आणि रविवारी फेरीवाल्यांचे बस्तान बसल्याने नागरिकांमध्ये कारवाईची कमालीची उत्सुकता ताणली आहे. दादर रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर बसूनही फेरीवाले व्यवसाय करताना दिसत होते. त्यामुळे पोलिस आयुक्त व महापालिकेचे आयुक्त स्वत: दादरमध्ये येवून गेले तरी दादर रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त होणार नाही, असा सूर येथील फेरीवाल्यांसह नागरिकांमधून ऐकायला येत आहे. दरम्यान, महापालिका अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त चंदा जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटरच्या अंतरावर पट्टा मारला जावा अशा प्रकारचे  निर्देश सर्व विभाग कार्यालयांना दिले आहेत. त्यानुसार कार्यवाही विभागाच्यावतीने सुरु आहे. मात्र आपण पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून फेरीवाल्यांवरील कारवाईला प्रथम प्राधान्य देत रेल्वे स्थानकाशेजारी परिसर फेरीवाला मुक्त ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिस आयुक्तांनीही या प्रकरणात लक्ष घातल्याने ही कारवाई अधिक प्रभावशाली होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.