पूर्व उपनगरांतील ‘या’ सफाई कामगार वसाहतींचा होणार पुनर्विकास

घाटकोपर, कुर्ला येथील सदनिकांसाठी २९४.१२ कोटी रुपये, तर देवनार, चेंबूर येथील सदनिकांसाठी २०८ कोटी खर्च येणार आहे.

महापालिकेच्या घनकचरा विभागातील सफाई कामगारांच्या वसाहतींचा पुनर्विकास करण्यात येणाऱ्या आश्रय योजनेतील प्रकल्पांना गती देण्यात येत असून यापूर्वी मंजूर करण्यात आलेल्या काही प्रकल्प कामांसह आता पूर्व उपनगरातील सफाई कामगारांच्या वसाहतींचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. यामध्ये आता देवनार संक्रमण शिबिर, चेंबूर बामणवाडी, सिंधी सोसायटी तसेच घाटकोपर चिराग नगर, कुर्ला लायन्स गार्डन आणि एस विभागातील आम्रपाली बिल्डींग आदी ठिकाणी ही योजना राबवण्यात येणार आहे. दोन भागांमध्ये राबवण्यात येणाऱ्या या कामांसाठी कंत्राटदारांची निवड करण्यात आलेली आहे. यामध्ये सुमारे ५०० कोटी रुपये खर्च करून सुमारे १५०० हून अधिक सदनिकांची बांधणी केली जाणार आहे.

घाटकोपर, कुर्ला येथील सदनिकांसाठी २९४.१२ कोटी रुपयांचा खर्च 

घाटकोपर चिराग नगर, कुर्ला लायन्स गार्डन आणि एस विभागातील आम्रपाली बिल्डींग आदी ठिकाणच्या महापालिका सफाई कामगारांच्या वसाहतींचा आश्रय योजनेतंर्गत पुनर्विकास डिझाईन आणि टर्नकीवर गट क्रमांक ११ अंतर्गत करण्याचा निर्णय घेतला. यासाठी मागवलेल्या निविदांमध्ये ३०० चौरस फुटांच्या ३७० सदनिका आणि ६०० चौरस फुटांच्या ६६ एवढ्या सदनिका अपेक्षित होत्या. परंतु यामध्ये पात्र ठरलेल्या मेसर्स किंजल सिव्हिलकॉन एल.एल.पी या कंपनीने ३०० चौरस फुटांच्या ८५५ व ६०० चौरस फुटांच्या ६४ सदनिका बांधून देण्याची तयारी दर्शवली आहे. या सदनिकांच्या बांधणीसाठी २९४.१२ कोटी रुपयांचा खर्च  येणार आहे.

(हेही वाचा : महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी गटविमाऐवजी आता ‘ही’ योजना!)

देवनार, चेंबूर येथील सदनिकांसाठी २०८ कोटी खर्च 

देवनार संक्रमण शिबिर, चेंबूर बामणवाडी, सिंधी सोसायटी या महापालिकेच्या सफाई कामगारांच्या वसाहतींचा पुनर्विकास आश्रय योजनेमध्ये करताना प्रशासनाने ३०० चौरस फुटांच्या ५१६ आणि ६०० चौरस फुटांच्या ५० सदनिका प्रस्तावित केल्या होत्या. परंतु यासाठी पात्र ठरलेल्या ३०० चौरस फुटांच्या ६२१ आणि ६०० चौरस फुटांच्या ५६ सदनिका बांधून देण्याची तयारी दर्शवली आहे. यासाठी किंजल सिव्हिलकॉन एल.एल.पी ही कंपनी पात्र ठरली असून त्यावर २०८.०४ कोटी रुपये खर्च होणार आहे.

  • चिराग नगर,घाटकोर :  भूखंडाचे क्षेत्र- २७८९ चौरस मीटर ( सदनिका : ३०० चौ.फू-१४०, ६००चौ.फू-०)
  • कुर्ला लायन्स गार्डन:  भूखंडाचे क्षेत्र- ६६५२चौरस मीटर ( सदनिका : ३०० चौ.फू-४१६, ६००चौ.फू-६४)
  • एस विभाग आम्रपाली बिल्डींग:  भूखंडाचे क्षेत्र -११७९चौरस मीटर ( सदनिका : ३०० चौ.फू-२९९, ६००चौ.फू-०)
  • एम पूर्व देवनार संक्रमण शिबिर:  भूखंडाचे क्षेत्र- ३५६३चौरस मीटर ( सदनिका : ३०० चौ.फू-३६८, ६००चौ.फू-५६)
  • एम पश्चिम बामणवाडी सिंधी सोसायटी:  भूखंडाचे क्षेत्र- २१९८ चौरस मीटर ( सदनिका : ३०० चौ.फू-२५३, ६००चौ.फू-०)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here